ताज्या बातम्या

मलकापूर नगरपरिषदेवर भाजपाची पकड भक्कम; तेजस सोनवणे यांचा ५,२७७ मतांनी दणदणीत विजय

मलकापूर(विजया माने) : मलकापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी तब्बल ५,२७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली. तेजस सोनवणे यांना एकूण १०,७४९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५,४७२ आणि शिवसेना शिंदे गटाचे अक्षय मोहिते यांना ७०४ मते मिळाली.
नगराध्यक्षपदासह नगर परिषदेच्या विविध प्रभागांचे निकाल जाहीर होताच मलकापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि विजय घोषणा देत समर्थकांनी जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या, तर काही प्रभाग बिनविरोध ठरल्याने निकाल अधिकच लक्षवेधी ठरले.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये भाजपाच्या अश्विनी शिंगाडे यांनी राष्ट्रवादीच्या कांचन लोहार यांचा २९८ मतांनी पराभव केला. प्रभाग १ ब मध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नितीन काशीद पाटील यांनी ३१९ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग २ अ मध्ये भाजपाच्या गीतांजली पाटील यांनी १२१ मतांनी विजय मिळवला, तर २ ब मध्ये अपक्ष उमेदवार भीमाशंकर माउर यांनी १०६ मतांनी बाजी मारली.
प्रभाग ३ अ मध्ये भाजपाचे धनंजय येडगे ३१७ मतांनी विजयी झाले असून ३ ब हा प्रभाग बिनविरोध ठरला. प्रभाग ४ अ देखील बिनविरोध झाला, तर ४ ब मध्ये भाजपाच्या कल्पना रैनाक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा ४६ मतांनी पराभव केला.
प्रभाग ५ अ मध्ये राष्ट्रवादीच्या मृणालिनी इंगवले यांनी १३५ मतांनी विजय मिळवला, तर ५ ब मध्ये राष्ट्रवादीचेच दादा शिंगण यांनी ४९ मतांनी विजय संपादन केला.
प्रभाग ६ अ मध्ये भाजपाच्या सीमा सातपुते यांनी ६९० मतांनी दणदणीत विजय मिळवला, तर ६ ब मध्ये सुरज शेवाळे यांनी तब्बल ८४७ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग ७ अ आणि ७ ब हे दोन्ही प्रभाग बिनविरोध ठरले.
प्रभाग ८ अ मध्ये भाजपाच्या गीता साठे यांनी ३६२ मतांनी, तर ८ ब मध्ये भाजपाचे शरद पवार यांनी ३८६ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग ९ अ आणि ९ ब हे दोन्ही प्रभागही बिनविरोध ठरले.
प्रभाग १० अ मध्ये भाजपाचे प्रमोद शिंदे यांनी ६२४ मतांनी, तर १० ब मध्ये भाजपाच्या स्वाती थोरात यांनी ३५५ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग ११ अ मध्ये भाजपाच्या राज्यश्री जगताप यांनी ३६२ मतांनी, तर ११ ब मध्ये भाजपाचे मनोहर शिंदे यांनी १६६ मतांनी विजय मिळवला.
या निकालातून मलकापूर नगर परिषदेवर भाजपाचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top