मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ईडी हे नरेंद्र मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असून सोनियाजी व राहुलजी गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. भ्रष्टाचाराचे आरोप करून काँग्रेस पक्ष, सोनियाजी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यात आले. भाजपा सरकारने काँग्रेस नेतृत्वाला जाणीवपूर्वक व राजकीय सुडबुद्धीने गोवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने निकाल दिला आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनियाजी व राहुलजी गांधी यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात आमदार मा. मंत्री अस्लम शेख, डॉ. ज्योती गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष रविकांत बावकर, कचरू यादव, केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी, राजपती यादव, ट्युलिप मिरांडा, सुभाष भालेराव, फरहान आझमी, अखिलेश यादव, राजेश शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा सरकारने मोर्चाला अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशाचीही तमा न बाळगता सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.
“देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे, त्याग केला आहे, त्यांच्यावर खोटे आरोप लावून बदनाम करण्याचे पाप करु नका हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ईडी नेही लक्षात ठेवावे. अशा प्रकारे काँग्रेस नेतृत्वाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून चोख उत्तर देईल’, असा इशारा यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.
सरकार मंत्री माणिकराव कोकाटे व पार्थ पवारांच्या पाठीशी.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची २ वर्षांची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे पण भाजपा सरकार त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत नाही व सचिवालयानेही अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही. लोकसभेतील विरोधी राहुल गांधी यांच्यावर खोट्या प्रकरणी शिक्षा होताच २४ तासात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली, त्यांचे सरकारी निवासस्थान खाली करण्यात आले. काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांना शिक्षा होताच त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात आली पण माणिकराव कोकाटे यांना महायुती सरकार वाचवत आहे.
पुण्यातील १८०० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावरही कारवाई केली नाही. ९९ टक्के भागिदारी असणाऱ्या पार्थ पवारांना वाचवले आणि अधिकारी व इतरांवर कारवाई करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोणताही गुन्हा नसतानाही काँग्रेस नेते सोनियाजी व राहुलजी गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. तासनतास चौकशी करण्यात आली. सत्ताधारी भाजपा विरोधकांना नाहक त्रास देऊन कारवाई करते पण स्वतःच्या लोकांना वाचवते. सत्ताधारी पक्षाला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय आहे का, असा संतप्त सवालही खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.




