
मुंबई : शिवसेना शिव आरोग्य सेनेतर्फे रक्तपेढी विभागातील तंत्रज्ञ तथा रक्तदान शिबिरांचे ‘विक्रमादित्य’ म्हणून ओळख असलेले श्रीधर बुधाजी देवलकर यांना कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. हा छोटेखानी सन्मान सोहळा दादर येथील शिवसेना भवन अंतर्गत असलेल्या शिव आरोग्य सेना कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस सन्माननीय श्री जितेंद्र सकपाळ यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय छायांकित दिवाळी अंक २०२५ मध्ये ‘पोस्टमन’ या विषयावर कथा व कविता सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार श्री देवलकर यांनी स्वलिखित कथा आणि कविता सादर केली. या दोन्ही साहित्यकृतींना छायांकित दिवाळी अंकातून प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे, स्वेच्छा रक्तदानाच्या कार्यात पूर्णवेळ व्यस्त असतानाही त्यांनी लेखन, कविता, गीते आणि व्यंगचित्रकलेची आवड जपली असून विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या लेखणीला प्रथमच मिळालेली ही प्रसिद्धी व सन्मान त्यांच्या साहित्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
याशिवाय, बोरिवली येथील साहेब प्रतिष्ठानतर्फे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित देशपातळीवरील व्यंगचित्रकला स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला असून स्वरचित व्यंगचित्र सादर केले होते.
या कार्यक्रमास शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी श्री सय्यद साठविलकर, श्री अजित पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सन्मानाबद्दल श्री देवलकर यांनी श्री जितेंद्र सकपाळ व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच छायांकित दिवाळी अंकाचे संपादक श्री तांबे, कथा विभाग प्रमुख अंकिता चव्हाण, कविता विभाग प्रमुख मृगनयना भुजगवरे, शलाका कोठावदे, रसिका तुपे, प्रदीप बडदे आणि दिवाळी अंकाच्या सर्व सहकारी वर्गाचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.




