ताज्या बातम्या

जुने शालेय दाखले जतन करा; संघर्ष समिती कराडची गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी

कराड(प्रताप भणगे) : जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेले जुने शालेय दाखल्यांचे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जात, जन्मतारीख पडताळणीसह विविध शासकीय कामांसाठी गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. या रेकॉर्डचे तात्काळ जतन करण्यासाठी ऑनलाईन स्कॅनिंग अथवा लॅमिनेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समिती कराड यांच्या वतीने गटशिक्षण अधिकारी श्री. बिपीन मोरे यांना आज निवेदनाद्वारे करण्यात आली.

संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले की, अनेक जिल्हा परिषद शाळांमधील जुने रजिस्टर फाटलेल्या, ओलसर व वाचण्यायोग्य नसलेल्या स्थितीत आहेत. जात पडताळणी, जन्मतारीख प्रमाणपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्यासाठी या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात; मात्र रेकॉर्ड खराब झाल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या रेकॉर्डचे महसूल विभागाप्रमाणे डिजिटल स्कॅनिंग करून ऑनलाईन उपलब्धता सुनिश्चित करावी किंवा रजिस्टरचे लॅमिनेशन करून त्यांचे संरक्षण करावे, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदन देताना वहागाव सरपंच संग्राम पवार, सर प्रताप भणगे, उपसरपंच (साळशिरंबे) अभिजित चवरे आदी उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top