ताज्या बातम्या

साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू….

ातारा(अजित जगताप): साहित्य हे मानव निर्मित जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा शब्दरूपी आरसा आहे या साहित्यातूनच भविष्यात प्रेरणा घेऊन अनेक जण यशस्वी ठरतात ज्यांच्या घरी साहित्य असते… ते जगात सर्वश्रेष्ठ ठरते. असे मानले तर ते वावगे ठरणार नाही. छत्रपतींची राजधानी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय प्रवेश ज्या ठिकाणी झाला त्या सातारा भूमीत साहित्य संमेलन होत आहे. विशेष म्हणजे सातारच्या छत्रपती शाहू स्टेडियम वर ३२ वर्षानंतर एक धाव बाकी असताना ९९ धावांवर सर्वांचे लक्ष वेधून राहते. तशा प्रकारे साताऱ्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे सर्वांचे लक्ष वेधून गेलेले आहे. या साहित्य संमेलनाची लगबग सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे सर्वांचा उत्साह वाढलेला आहे.
सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ज्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व झाडाझडती, महानायक आणि पांगिरा पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील असून मृदुला गर्ग उद्घाघाटन करणार आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर चौधरी समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यातील आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद (शाहूपुरी शाखा) आणि मावळा फाउंडेशन आहेत. त्यामध्ये अनेकांना सहभागी करून घेतलेले आहे. साहित्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये साताऱ्याचे चौथे संमेलन आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली आहे. या संमेलनात नवीन लेखकांना संधी दिली जाणार आहे.
हे संमेलन साताऱ्यासाठी महत्त्वाचे असून, यात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक व सामाजिक आशयाचे कार्यक्रम सादर केले जाणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली.
मराठी भाषा प्राचीन साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्षापासून म्हणजे २७०० वर्षापासूनचा असल्याचा सर्वमान्य उल्लेख आहे. इ.स.पूर्व ३०० मध्ये वररुची (कात्यायन) यांनी ‘प्राकृत प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला होता. अर्थात तो त्यावेळी रुढ असलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेत होता. याशिवाय त्याकाळी व नंतरही महाराष्ट्रातल्या विविध राजे, संस्थानिक, पराक्रमी योद्धे, लढाईतील विजेते, पराभूत अशा अनेकांनी जे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, वीरगळ, विविध देवतांची स्तोत्रे, पोथ्या, ओव्या, अभंग, उखाणे इत्यादिमधून मराठी भाषेचे लिखित व बोली स्वरुपात संक्रमण होत गेले. ते महाराष्ट्री प्राकृत, मागधी, अर्धमागधी, पाली, संस्कृत यातूनही होत होते. संत ज्ञानेश्‍वरांनी १२ व्या शतकात लिहिलेली ‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी भाषेचे अमृत लेणे आहे पण ते सन १८४५ पर्यंत मौखिक, हस्तलिखित या स्वरुपात होते. कारण मुंबईत मुद्रणकला सन १८३० पासून ब्रिटीशांमुळे सुरु झाली. त्याआधी सेरामपूर येथे सन १८०५ पासून मराठीत काही पुस्तके छापली जात होती. परंतु ‘ज्ञानेश्‍वरी’ हा वैश्‍विक साहित्य व मानवी मूल्य असलेला ग्रंथ असल्यामुळे पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (६ जानेवारी १८३२) व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ (१ मे १८४०) सुरु करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्याचे महत्त्व कळाले होते. म्हणून त्यांनी अनेक ‘ज्ञानेश्‍वरी’ची हस्तलिखिते तपासून एकनाथकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ची पाठभेदासहित शुद्धीकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ लिहून सन १८४५ साली मुंबईतल्या प्रभाकर छापखान्यात छापून प्रथमच प्रकाशित करुन मुद्रित प्रत उजेडात आणली.
अशा अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख, निबंध, इतिहास, चरित्र, कादंबरी, नाटक, कविता, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र इत्यादी माध्यमातून उत्क्रांतित झालेली मराठी भाषा आता अभिजात भाषा बनली आहे.
मराठी भाषेच्या साहित्य संमेलना बाबत अनेक अंगाने त्याला सुदृढ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मराठी साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, नवोदित कवी लेखक साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, आणि प्रांतिक साहित्य संमेलनाचा ही मोठा समावेश आहे.विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था होती. लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासह चिंतामणराव वैद्य, विशूभाऊ राजवाडे आणि पांगारकर आदी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या साक्षीने महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) अधिकृत स्थापना झाली. पुण्याच्या सदाशिव पेठेतील मळेकर वाड्यात सन १९०६ मध्ये या संस्थेचे कार्य सुरु झाले. ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था होय. खरं तर या परिषदेची स्थापनाच मुळी पुणे येथील सन १९०६ च्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाली होती.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ज्याला म्हणता येईल असे पहिले मराठी ग्रंथकार संमेलन पुण्यातील हिराबागमध्ये ११ मे१८७८ रोजी झाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले होते. पण ही परंपरा दरवर्षी सुरु राहिली नव्हती. दुसरे संमेलन (१८८५ पुणे), २० वर्षांनी प्रथमच तिसरे संमेलन पुण्याबाहेर सातारा येथे (१९०५) आणि चौथे सन १९०६ मध्ये परत पुण्यालाच आणि त्यात वर उल्लेखल्याप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था सुरु झाली. त्यामुळे पुढची संमेलने महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत सन १९६४ पर्यंत ४५ साहित्य संमेलने झाली.
या पार्श्‍वभूमीवर या संमेलनामध्ये सातारा जिल्हा भाग्यवान आहे. मुळातच अखंड सातारा जिल्ह्याची (सांगलीसह) आणि नंतर सातारा जिल्ह्याची साहित्य परंपरा फार मोठी आहे. सध्याच्या सातारा जिल्ह्यात आंबेडकर अकादमी पुरस्कृत किशोर बेडकिहाळ , दिनकर झिंब्रे यांच्या नेतृत्त्वात विचारवेध संमेलने, पार्थ पोळके व विजय मांडके यांची विद्रोही साहित्य संमेलने, फलटण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेतर्फे विनोद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरु केलेला मराठी भाषा पंधरवडा निमित्तचे साहित्यिक कार्यक्रम, कृष्णा कोयना संगमावरील कराडमध्ये दिवंगत मोहन कुलकर्णी व आनंद परांजपे यांनी चौफेर व कराड जिमखाना यांच्या माध्यमातून वाङ्मय व नाट्य क्षेत्रातले अनेक कार्यक्रम, कृष्णा काठावरील वाईचे लोकमान्य टिळक वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला, सातारा येथील कै. वि. ल. चाफेकर यांनी सुरु केलेल्या व आजही चालू असलेल्या ज्ञान विकास मंडळाची व्याख्यानमाला, दिलीपसिंह भोसले व अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले (फलटण) यांनी सुरु केलेली प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला, सातारा नगरवाचनालय येथील व्याख्यानमाला, तसेच शिरीष चिटणीस यांच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेचे साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ताराचंद्र आवळे यांच्या माणदेशी साहित्य सभेतर्फे होणारी कवी संमेलने, रविकिरण मंडळाचे प्रवर्तक कवि गिरीश (रहिमतपूर) व राजकवि यशवंत (य. दि. पेंढारकर) (चाफळ) येथील साहित्यिक व कविसंमेलने, अरुण गोडबोले (सातारा) व मधु नेने (वाई) आयोजित समर्थ सांप्रदायातील भक्ती कार्यक्रम, कादंबरीकार राजेंद्र माने व रवींद्र भारती यांच्या अश्‍वमेध संस्थेचे साहित्यिक कार्यक्रम, प्रकाश सस्ते (फलटण) आयोजित छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन इत्यादी वाड्मयीन व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांनी सातत्याने सातारा जिल्ह्याची साहित्यिक व सांस्कृतिक उंची वाढविली आहे.सातारा जिल्ह्याने अनेक प्रसिद्ध साहित्यिक व नाटककार व संत वाङ्मयातील लेखक महाराष्ट्राला दिले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), गोपाळ गणेश आगरकर (टेंबू, कराड), कवि गिरीश व नाटककार प्रा. वसंत कानेटकर (रहिमतपूर), प्राचार्य शिवाजीराव भोसले (फलटण), नाटककार शां.गो.गुप्ते (सातारा), ‘उपरा’कार लक्ष्मण माने (सातारा), बेबीताई कांबळे (फलटण), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), पार्थ पोळके (सातारा), आधुनिक कविवर्य बा. सी. मर्ढेकर (मर्ढे), प्रा. दिलीप जगताप (वाई), जयवंत गुजर (सातारा रोड), जगन्नाथ शिंदे (पाचगणी), अरुण गोडबोले (सातारा), वासंती मुजुमदार (कराड), गौरी देशपांडे व जाई निमकर (फलटण), अशोक नायगावकर (वाई), रवींद्र भट (वाई), ना. सं. इनामदार (खटाव), विद्याधर म्हैसकर, दीपा गोवारीकर (कराड), प्रसिद्ध पटकथा लेखक प्रताप गंगावणे व कादंबरीकार डॉ. राजेंद्र माने (सातारा), डॉ. हे. वि. इनामदार (खटाव), रा. ना. चव्हाण (वाई), श्री. के. क्षीरसागर, चिंतामणराव कोल्हटकर व प्रा. श्री. म. माटे (सातारा), प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत (कराड), किशोर बेडकिहाळ (सातारा), बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्र अभ्यासक रवींद्र बेडकिहाळ (फलटण), प्रा. यशवंत पाटणे (सातारा), ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी (कराड), शांतिलाल भंडारी, मिरदेव गायकवाड (कोरेगाव), ऐतिहासिक कादंबरीकार ना. ह. आपटे (कोरेगाव), परदेशस्थ असूनसुद्धा मराठीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. मॅक्सीन बर्नसन (फलटण, सध्या हैद्राबाद), मराठी कादंबरीचे जनक बाबा पद्मजी व लक्ष्मण मोरेश्‍वर शास्त्री हळबे (वाई), डॉ. न. म. जोशी (पाटण) यांसह नवोदित साहित्यिक अरुण विश्वंभर, निलेश महिगावकर , जयंत लंगडे,प्रा . बोधे, असे अनेक साहित्यिकांचा समावेश आहे.
९८ संमेलनांपैकी ६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने सातारा जिल्ह्यामध्ये झाली आहेत. सातारा, सांगली सह जेव्हा अखंड सातारा जिल्हा होता, त्यावेळी सन १९०५ मध्ये सातारा येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे अध्यक्ष होते तत्कालीन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक रघुनाथ पांडुरंग करंदीकर. त्यानंतर सातारा जिल्हा स्वतंत्र झाल्यावर सातारा येथे १९६२ – अध्यक्ष : नरहर गाडगीळ, १९७५ – कराड – अध्यक्ष दुगाबाई भागवत, १९९३ – सातारा – अध्यक्ष : विद्याधर गोखले, २००३ – कराड – अध्यक्ष : सुभाष भेंडे, २००९ – महाबळेश्‍वर – अध्यक्ष : आनंद यादव पण अनुपस्थित. यापैकी सन १९७५ चे कराड आणि सन २००९ चे महाबळेश्‍वर येथील संमेलन वादग्रस्त झाले होते. आणीबाणीमध्ये विचार, भाषण आणि लेखन स्वातंत्र्यावर बरीचशी बंधने आली होती. अध्यक्ष होत्या प्रसिद्ध आणि अतिशय स्पष्टवक्त्या आणि बंडखोर स्वभावाच्या साहित्यिका दुर्गा भागवत आणि स्वागताध्यक्ष होते आणीबाणी लादणाऱ्या केंद्र सरकारमधील वजनदार परराष्ट्र मंत्री आणि कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण. त्यामुळे आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवरील हे संमेलन आधीच वादग्रस्त झाले होते. तसेच राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर कशाला घ्यायचे? हा वादही त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चालू होता. परंतु, यशवंतराव चव्हाणांच्या संयमी व रसिक साहित्यप्रेमीच्या भूमिकेमुळे संमेलन यशस्वी झाले. परंतु, यशवंतरावांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कितपत असावा याबद्दलचे त्यांनी केलेले भाष्य सर्वच संमेलनाच्या इतिहासातील मार्गदर्शक असे होतेमहाबळेश्‍वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव होते. परंतु त्यांच्या एका पुस्तकात संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय तसेच संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह (?) मजकूर असल्यामुळे त्यावर महाराष्ट्राच्या साहित्यविश्‍वात प्रचंड खळबळ झाली होती. अखेर आनंद यादव यांचे अध्यक्षीय भाषण छापून तयार होवूनसुद्धा त्यांना अध्यक्षपदावर उपस्थित होता आले नाही. संमेलन अध्यक्षाविनाच हे साहित्य संमेलन पार पडले. परंतु पुरोगामी विचारातील संपन्न असलेल्या आणि सर्वधर्मसमभाव जागृत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीत असे घडायला नको होते. ही भावनाही साहित्यविश्‍वात होती. आजही साहित्य क्षेत्रामध्ये काही बदल होत आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. गणपत वाणी बीडी पिताना चावायचा नुसताच काडी आणि मनात म्हणायचा या जागेवर बांधील माडी.. असे महान काव्य लिहिणाऱ्या कवीवर्य बा.सी मर्ढेकरांचे स्मारक या निमित्त झाले आहे. या साहित्य संमेलनासाठी विशेष परिश्रम घेणारे साहित्यिक आणि ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,
कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी ,कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत त्याचबरोबर साहित्य संमेलनातील सर्व समितीचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य यांना मनापासून शुभेच्छा देऊन या साहित्य संमेलनाचा एक हिस्सेदार म्हणून या आनंदी सोहळ्यात सहभागी होणारा वारकरी म्हणून आपणा सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. संमेलनासाठी आता अवघे वीस दिवस बाकी असून या सोहळ्यासाठी साहित्य पंढरी सज्ज झालेले आहे. हे मात्र खरी आहे.— श्री .अजित जगताप, सातारा ९९२२२४१२९९
——– —- —……………
फोटो– सातारा येथील साहित्य संमेलनातील नवे जुने अध्यक्षांचे संग्रहित छायाचित्र

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top