नागपूर(भीमराव धुळप) : केंद्र सरकारने २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असून महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत आघाडीवर आहे. “राज्य नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवाद निर्मूलनासाठी दुर्गम भागात नव्या पोलिस चौक्या सुरू करण्याचे निर्देश दिले. सर्व चौक्यांमध्ये मनुष्यबळ व सुविधा पुरवून, त्या भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन चौक्यांवर शासकीय लाभांचे शिबिरे, रोजगार उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ही पोलिसांच्या कार्यक्षमतेची मोठी कामगिरी असल्याचे सांगून, आत्मसमर्पणास प्रवृत्त करणाऱ्या गडचिरोली पोलिसांना १ कोटी रुपये बक्षीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासही त्यांनी सांगितले. नव्या एसपी कार्यालयाचे काम सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आणि पोलीस दलासाठी ३३ नवीन वाहनांची खरेदी अत्यंत तत्परतेने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
लाहेरी येथे २००९ मध्ये १७ जवान शहीद झाल्यानंतर नक्षल्यांनी आनंद साजरा केला होता. त्याच ठिकाणी उभारलेली नवीन पोलिस चौकी आज नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे प्रतीक ठरत आहे.
धोडराज–निलगुंडा–कवंडे रस्ता, इंद्रावतीवरील ७५० मी. पूल आणि ५०० हून अधिक नवीन मोबाईल टॉवर्समुळे गडचिरोलीमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होत असून नक्षल चळवळीला विकासकामांनी उत्तर दिले जात आहे.




