मुंबई : चोवीस तास बातम्यांच्या जगात वावरणाऱ्या पत्रकारांच्या संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेला रंगभूमीवर योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघ पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. संघातर्फे सादर होणाऱ्या ‘निष्पाप’ या द्वि-अंकी नाटकाचा पहिला प्रयोग गुरुवार, ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर येथे होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण निर्मित या नाटकासाठी लेखक प्रा. दिलीप परदेशी यांचे प्रभावी लेखन आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचे कसदार दिग्दर्शन लाभले आहे. ‘निष्पाप’ हे नाटक पत्रकारांच्या अभिनयकौशल्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे. ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले आणि स्वाती घोसाळकर प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांच्यासह प्रशांत चिडे, रश्मी महांबरे, सिद्धेश शिगवण, सुरेश ठुकरुळ यांच्या या नाटकात महत्वाच्या भूमिका आहेत.
पत्रकार संघाच्या इतिहासातील राज्य नाट्य स्पर्धेतला हा पहिलाच सहभाग असल्याने हा उपक्रम विशेष ठरत आहे. पत्रकारांसाठी – पत्रकारांकडून – पत्रकारांचे हे नाट्यप्रयोग रसिकांसाठी नव्या अनुभवाची मेजवानी ठरणार आहेत.
या प्रयोगास नाट्यप्रेमी आणि पत्रकारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.




