ताज्या बातम्या

घणसोलीतील ऑरम सोसायटीच्या ७२० कुटुंबांवर एमआयडीसीचा ‘कमर्शियल पाणी दर’ अन्याय; योगेश चव्हाण यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषण

नवी मुंबई : घणसोली येथील ऑरम सोसायटीतील ७२० कुटुंबांवर एमआयडीसीकडून पिण्याच्या पाण्यासाठी कमर्शियल दर आकारला जात असल्याच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संपूर्ण निवासी क्षेत्र असूनही व्यावसायिक दराने पाणीपुरवठा करणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सोसायटीचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की मागणी मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.

चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कमर्शियल दरामुळे सोसायटीतील प्रत्येक कुटुंबावर दरमहा हजारोंचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. एमआयडीसीकडे वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही सकारात्मक निर्णय मिळत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

उपोषणस्थळी सोसायटीतील रहिवाशांसह विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निवासी दर लागू करा” आणि “आर्थिक शोषण बंद करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला.

दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, अनशन सुरू झाल्यानंतर प्रकरणासंदर्भात उच्चस्तरीय चर्चा सुरू करण्यात आली आहे. तरीही निर्णय होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणामुळे घणसोली परिसरातील पाणी दर निश्चितीची धोरणे, नागरिकांवरील आर्थिक भार आणि प्रशासनाची निष्क्रियता यासंबंधी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. “निवासी भागाला निवासी दर हा आमचा हक्क आहे; त्यासाठी लढा सुरूच राहील,” असे रहिवाशांनी ठामपणे सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top