ताज्या बातम्या

धारावीमध्ये ‘एक पेन एक वही’ उपक्रम; महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री-पुरुष दहावी विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटप

मुंबई : विश्वरत्न, घटना तज्ञ आणि क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या शिक्षणावरील प्रखर भूमिकेची जाण ठेवत धारावी येथील युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या या कार्यक्रमात दिवसभर मजुरीचे काम, जुनी भांडी धुणे आणि कुटुंबाची जबाबदारी पेलत बाहेरून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीच्या स्त्री-पुरुष विद्यार्थ्यांना ‘एक पेन एक वही’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू झनके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश — डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला अभिवादन करणे हा होता.

कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. राजू सोनवणे, डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचे प्रमुख सल्लागार दिलीप गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीराज शेरखाने, श्रीमती अलका साबळे तसेच शिक्षक रमेश कोकीटकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्याची संधी मिळाली.

‘एक पेन एक वही’ वितरण आणि सामूहिक आदरांजली या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून उपस्थितांनी या कार्याचे कौतुक केले, अशी माहिती रात्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे यांनी दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top