ताज्या बातम्या

टीईटी सक्ती व 15 मार्च 2024 च्या जीआरविरोधात राज्यभर शाळा बंद; मुंबईत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून निवेदन सादर

प्रतिनिधी :

टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 च्या अन्यायकारक संच मान्यता जीआरच्या विरोधात राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना 5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शाळा बंद आंदोलनात सहभागी होणाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला असला, तरीही मुंबईतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी ठाम भूमिका घेत उपसंचालक शिक्षण यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना एकजुटीने सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अनुदानित शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा 9 डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सुभाष मोरे यांनी दिला.

या आंदोलनात ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, संस्थाचालक संघटनेचे गिरीश सामंत, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मुंबई अध्यक्ष देवीदास पंडागळे, शिक्षक मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे तसेच शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top