नवी मुंबई : उलवा पोलीस ठाण्यात एका घरभाडे व्यवहारात चार लाख रुपयांच्या हेवी डिपॉझिट घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात तक्रारदार किर्ती नायडू यांनी मुशीर खान आणि आलिया मुशीर खान यांच्याविरोधात अर्ज दाखल केला असून, पोलीसांनी दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र बजावले आहे.
तक्रारीनुसार, उलवे सेक्टर-१८ मधील के. के. सफायर इमारतीतील रूम क्रमांक १०२ साठी आरोपींनी आयसीआयसीआय बँक खात्यातून चार लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारांनी दिलेल्या रकमेतून त्यांनी त्रयस्थ व्यक्तीस रूम भाड्याने दिल्याची बाबही नमूद केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पैसे मागितल्यावर आरोपींकडून बँकेच्या खोट्या पावत्यांचा वापर करून दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने उलवा पोलीसांनी संबंधितांकडे रूमचे कागदपत्र व बँक स्टेटमेंटसह चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत विदेश (दुबई) प्रवास करू नये, अशी समजही देण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून घराबाहेर मालमत्ता भाड्याने देताना किंवा हेवी डिपॉझिट व्यवहार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.सदर व्यक्ती सध्या दुबईला पळून गेला असल्याची माहिती तक्रारदार यांच्याकडून मिळाली आहे.




