कराड :

कराड तालुक्यातील वाठार (ता. कराड) परिसरात मंगळवारी पहाटे नाशिकहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर ४५ जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विद्यार्थ्यांची सहलीची बस कोकणातून नाशिककडे परत येत होती. वाठार परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याचे चालकाच्या लक्षात न आल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या खोदकामाच्या बाजूला खाली घसरून कोसळली. मोठी जीवितहानी टळली असली तरी बसमध्ये असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तसेच पोलिस पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून मदतकार्य सुरू करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराड येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाच विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून इतर ४५ जखमी विद्यार्थ्यांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृत्तीची माहिती घेतली.




