
धारावी(भीमराव धुळप) : भारतीय संविधानाला २०२५ मध्ये ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत २६ नोव्हेंबर संविधान दिन धारावीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या पुढाकाराने संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथे स्थानिक नागरिकांना एकत्र करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी चर्मकार नेते बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. अनिल कासारे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची जाणीव पुन्हा दृढ केली.
अत्यंत कमी वेळेत समाज बांधवांना एकत्र करून संविधान दिनाचे औचित्य साधत तसेच २६ नोव्हेंबर रोजी लढता लढता वीर झालेले शहीद जवान यांच्या स्मरणार्थ सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली आणि ती यशस्वीपणे अमलात आली, हे विशेष अधोरेखित करण्यात आले. मुंबई अध्यक्ष श्री. विलास गोरेगावकर यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात श्री. गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती आणि शहीद जवानांच्या छायाचित्रांच्या प्रती मोफत वाटप करून प्रशंसनीय योगदान दिले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शंकर बळी, सुनील पवार, विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अखेरीस दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




