मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा मुंबईसह उपनगरातील लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडत आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सांगत आज सायंकाळी 6 वाजता झाली असून प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यांतील मतदान 20 मे रोजी होणार असून बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. राजधानी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून पोलिसांची आगाऊ कुमूक मागविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता 20 मे रोजी होत असून मुंबईतसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातील पहिल्या 4 टप्प्यात किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत आणि शांततेच पार पडले. त्यामध्ये, पोलिसांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर, राज्यातील प्रचारसभांचाही शेवट आज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभा मुंबईसह महाराष्ट्रात पार पडल्या. या सभांसाठीही पोलिसांनी दिवस-रात्र मेहनत घेत चोख बंदोबस्त निभावून दाखवला. आता, शेवटच्या 20 मे रोजीच्या मतदानसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.
मुंबईसह उपनगरातील अतिरिक्त मदतीकरीता 170 पोलीस अधिकारी व 5360 पोलीस अंमलदार व 6200 होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी 36 केंद्रिय सुरक्षा दले यांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे, मुंबईत एकुण 2752 पोलीस अधिकारी, 27460 पोलीस अंमलदार, 6200 होमगार्ड, 03 दंगल काबु पथक, 36 केंद्रिय सुरक्षा दले निवडणुक बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.