Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशउद्धव ठाकरेच कशाला? शरद पवारही भाजपसोबत जातील - प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरेच कशाला? शरद पवारही भाजपसोबत जातील – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नवा गौप्यस्फोट केला आहे. 4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवारही भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हा दावा करतानाच त्यांनी काही कारणंही दिली आहेत. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबाबतचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाचव्या टप्प्याच्या मतदानाला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्याआधीच आंबेडकर यांनी बार उडवून दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला? शरद पवारही भाजपसोबत जातील. शरद पवार यांची काहीही गॅरंटी देता येत नाही. ते इथे राहतील याची गॅरंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील. दोघेही जातील. यात नवीन काहीच नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले. त्यांचं काँग्रेससोबत पटलं नाही. त्यांना शरद पवार गटाचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यामागे जो ससेमिरा लावला आहे, त्यातून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाणं भाग आहे, अशी कारणेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली.
अजितदादा गटाचे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि मिसेस पवारही अजितदादांच्या कुटुंबीयांना भेटल्या होत्या. त्याही बातम्या होत्या. त्यामुळे सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटले असतील तर त्यात नवल नाही. निवडणुकीनंतरची कुटुंबातील ही नुरा कुस्ती कुठपर्यंत जाईल हे बघायचं राहिलं आहे, असं आंबेडकर म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments