प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या वेळी विशेषांकाचे प्रकाशन टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.
परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टमध्ये बाहेरगावावरून आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचार काळात वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनात थोडासा आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या टीमने हा उपक्रम राबविला. प्रकाशन सोहळ्यानंतर रुग्णांना दिवाळी विशेषांकाचे वाटप,तसेच लाडू वाटप करण्यात आले तसेच छोटीशी आर्थिक मदत देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
या प्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) यशवंत विचले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. हेमंत सामंत, तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.