कुडाळ(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील मेढा — पाचवड रस्त्यावरील महत्त्वाचे गाव असलेल्या सोनगाव या ठिकाणी लोक वर्गणीतून बस स्थानक बांधले होते. परंतु, दिवाळीच्या तोंडावर काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून हे बस स्थानक पाडल्यामुळे ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. अशी माहिती निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांनी दिली. तसेच सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. पंधरा दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
याबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या जावळी तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थांनी माहिती दिली की पाचवड – मेढा रस्त्यावरील सोनगाव गावच्या हद्दीमध्ये रस्त्यालगत बस थांबा नव्हता. प्रवाशांना बस व वाहनाची वाट पाहताना ऊन- वारा- पाऊस याचा सामना करावा लागत होता. याबाबत मानवता भावनेतून स्थानिक ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून सुसज्ज असे बस थांबा उभा केला . या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक जणांची चांगली सोय झाली. परिसरातील एक आदर्श बस थांबा म्हणून त्याकडे पाहिले जात होते. या बस थांब्यांमुळे जनतेची सोय होती. हे विसरून या बस थांब्यालाच जे.सी.बी.च्या साह्याने जमीन दोस्त करण्याचा घाट एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आदेशाने केल्यामुळे सोनगाव परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीतच प्रवाशांना शिमगा करण्याची वेळ आणली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जय ऐवजी पराजयाचे काळे ढग जमण्यास हातभार लागला का ?अशी शंका घेण्यास सुरुवात झालेली आहे.
बस थांबा जागेबाबत काही मालकी हक्क असेल तर लोकशाही मार्गाने रीतसर न्यायालयातून तशा पद्धतीने आदेश आला असता तर एक वेळ लोकांनी समजून घेतले असते. गावातच तंटा सोडवून एकमेकांना समजून घेतल्या असते तर बरे झाले असते. पण सोनगाव गावातील राजकारण बिघडवणाऱ्या प्रवृत्तीने याला हातभार लावला आहे. हुकूमशाह पद्धतीने आणि कायदा धाब्यावर बसवून जे कृत्य केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या निवेदनावर सोनगाव ग्रामस्थ प्रदीप चिकणे, देवदास पवार, प्रवीण मोरे, निलेश धुमाळ, उमेश काटकर, लालसिंग शिंदे, अक्षय शिंदे, मोहन शिंदे, पांडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे, विलास चिकणे, रणजीत भोईटे, गणेश मर्ढेकर, अनिल पवार, प्रकाश भोसले, मोहन रोकडे, प्रतीक रोकडे यांच्यासह शंभर – सव्वाशे मान्यवरांच्या सह्या आहेत .त्यामध्ये माता भगिनी असलेल्या वैशाली जाधव, सुनीता शिंदे, मनीषा शिंदे, सुरेखा चव्हाण, आशा भिलारे, कुसुम शिंदे, प्रेमा दरेकर, सुनंदा खुडे ,कुसुम दीक्षित, फुलाबाई शिंदे, मोनाली निगडे, आनंदा ससाणे, कमल मेंगळे अलका दुधाने, अश्विनी तावरे यांच्यासह आर्डे ,गुजरवाडी, सोनगाव, बेलावडे व परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांनी या निवेदनावर सह्या केलेल्या आहेत. दरम्यान याबाबत संबंधितांची संपर्क साधला असता ते सोनगाव परिसरा ऐवजी परगावी राहत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
जावळी तालुक्यातील सोनगाव रस्त्यावर बस थांबा अशी अवस्था केली..