मल्हारपेठ(विजय जाधव) : पाटण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक वाढू लागलेल्या मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. शुद्ध, पुरेसे पाणी, मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेची पाहणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील विविध गावच्या सरपंच, सदस्यांनी भेट देऊन ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद ठोके यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
तब्बल ८ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीने पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष सहकार्यातून व मार्गदर्शनातून विविध विकासकामे राबवत आहेत.
जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविली आहे. हि योजना पुर्णत्वाकडे आलेल्या परिपूर्ण पध्दतीने आणि क्लोरीन वापर करून नियमित ५ लाख लिटर पाणी शुध्दीकरण प्रकल्प आज लक्षवेधी ठरला आहे.
नियमित पुरेसा आणि मुबलक पाणी पुरवठा, तत्काळ गळती काढण्याची व्यवस्था, सतत ओटी टेस्ट घेणारी, गेल्या ५ महिन्यात एक ही तक्रार नसलेली, पावसाळ्यात ही नदीतून गढुळ पाणी उचलून ते अतिशय शुद्ध पाणी पुरवठा गावाला केल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागल्याने हा मल्हारपेठ पॅटर्न पाहण्यासाठी अनेक सरपंच, सदस्य येऊ लागले आहेत.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पाटण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद आणि वर्षे येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे संयुक्त सरपंच, सदस्यांचे प्रशिक्षण मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित सरपंच, सदस्यांनी आदर्श पाणी पुरवठा योजना पाहण्यासाठी क्षेत्र भेट दिली.
यावेळी सरपंच किरण दशवंत, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद ठोके, तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ गावाच्या पाणी पुरवठा योजनेची निष्ठापुर्वक जबाबदारी सांभाळणारे जलरक्षक विठ्ठल चव्हाण यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.