प्रतिनिधी : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज लोअर परेल येथील पीव्हीआरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाबाबत राज ठाकरे म्हणाले, “हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल! यापूर्वीचा सिनेमा मुंबईचा होता, पण हा महाराष्ट्राचा आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, मात्र पुण्यातील बैठकींमुळे ते गैरहजर राहिले. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मांजरेकर यांच्या पोशाखावर उपहासात्मक भाष्य करत म्हटलं, “एक काठीयवाडी माणूस मराठी चित्रपट बनवतो! महेश कोठाऱ्यांना सांगायला हवं ‘झपाटलेला 2’ काढा — हा खरा झपाटलेला माणूस आहे! ते पुढे म्हणाले, “महेश आणि माझ्यात एक गोष्ट समान आहे — आम्ही दोघेही जे पाहतो ते भव्य पाहतो. हा चित्रपट वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावर उभा आहे. हिंदीत यश चोप्रा आणि मराठीत महेश मांजरेकर आहेत. दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले की पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा पार्ट 2 नाही. “मला शेतकरी आत्महत्यांवर सिनेमा करायचा होता. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून ‘आपल्या राज्यात आपलीच अवस्था काय?’ हा प्रश्न पडला, आणि या भावनेतून हा सिनेमा निर्माण झाला, असं ते म्हणाले.
मांजरेकर यांनी पुढे सांगितले, आता मी मराठी सिनेमा करणार आणि त्याला हिंदीत डब करणार आहे. मराठी चित्रपटही 450 कोटी कमावू शकतो, याची मला खात्री आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांसोबत राज ठाकरे आणि महेश मांजरेकर यांचे भव्य फोटोशूट पार पडले.