कराड(प्रताप भणगे) : पाचवड फाटा ते येळगाव फाटा (कराड दक्षिण) या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमण आणि गटरांच्या दुरवस्थेबाबत धगधगती मुंबईचे कराड प्रतिनिधी पत्रकार प्रताप आबासो भणगे (रा. विठ्ठलवाडी, तुळसण) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या अर्जाची अवघ्या एका महिन्यात दखल घेण्यात आली आहे.
सदर अर्जात भणगे यांनी नमूद केले होते की, रस्त्याच्या साइड पट्ट्यांवर आणि गटरांवर तात्पुरते तसेच कायमस्वरूपी अतिक्रमण झालेले असून, झाडे-झुडूपे वाढल्याने आणि गटर मुजल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे वाहनधारक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
भणगे यांनी ही तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड दक्षिण (सातारा) तसेच मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनाही प्रत पाठवून नोंदवली होती.
अर्जाची दखल घेत विभागाने अतिक्रमण हटविणे, रस्ता दुरुस्ती व नालेसफाईची कामे तातडीने सुरू केली आहेत. या कृतीमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, अनेकांनी फोनद्वारे पत्रकार प्रताप भणगे यांचे आभार मानले आहेत.
धगधगती मुंबई हे जनतेच्या न्यायहक्कासाठी सदैव लढणारे वृत्तपत्र असल्याचे स्थानिक नागरिक बोलताना सांगतात. भणगे यांच्या पुढाकारामुळे जनतेच्या तक्रारीला मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद प्रशंसनीय ठरला आहे.