प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांच्या घरांचा इमारत देखभाल खर्च माफ करावा असे आदेश म्हाडाला दिले होते. मात्र म्हाडा अधिकारी अजून त्या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याने शिंदे यांचे आदेश केराच्या टोपलीत गेले असून गिरणी कामगारावरील अन्याय कायम आहे. आमच्या समस्या सोडवा अन्यथा घरच्या चाव्या परत करू असा आंदोलन इशारा गिरणी कामगार संकुल एकता समितीचे अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी दिला आहे.
निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाण्याचा तुटवडा आणि नादुरुस्त सुविधा तातडीने सुधारल्या नाहीत, तर आम्ही म्हाडाला चाव्या परत करू आणि भरलेले पैसे व्याजासह परत द्यावेत. यासाठी ९ ऑक्टोबर रोजी म्हाडा अध्यक्ष मिलिंद बोरीकर आणि कार्यकारी अभियंता अंकित मोसे यांची गिरणी कामगारांनी भेट घेतली. संकुलातील पाण्याचा तुडवडा, नादुरुस्त पाईपलाईन, टाक्यांची गळती, लिफ्ट आणि वीजपुरवठा नादुरुस्ती, रस्त्यांवरील खड्डे, वाढलेले गवत, कचऱ्याची न होणारी विल्हेवाट, भरमसाठ आकारला जाणारा देखभाल खर्च या अनेक समस्यांवर कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत यांनी सविस्तर माहिती दिली व दोन महिन्याची चावी परत पैसे परत इशारा आंदोलन मुदत दिली.