मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) — सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बेंचजवळ एका वकिलाने बूट फिरकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या भ्याड प्रकाराचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने तीव्र निषेध नोंदविला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबन घोलप व राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना आपल्या जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निषेध निवेदन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निवेदनात महासंघाने म्हटले आहे की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हा प्रकार मनुवादी विचारसरणीचा भारतीय संविधानावरच हल्ला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जातीतील सरन्यायाधीशावर हल्ला होणे ही जातीय मानसिकतेची लज्जास्पद झलक असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.
सदर निषेध निवेदन गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे व माधव गायकवाड यांना पाठविण्यात येईल.