मुंबई
(खंडूराज गायकवाड ) कधी वातानुकूलीत एसीच्या वायरी कुरतडून अधिकाऱ्यांना घाम फोडणे,.. कधी टेबलखाली घुसून अधिकाऱ्यांना जागच्या जागी उठाबश्या करायला लावणे… तर कधी महिनोमहीने टेबलावर पडलेल्या फायलीवर आपलं साम्रराज्य गाजविणाऱ्या “मूषक मंडळा”ने सध्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर आपला वेढा दिला आहे. मात्र यामुळे शिस्त-स्वच्छता-शुचिता यांचे डोलारे दाखवणाऱ्या मंत्रालयाच्या पायाभूत व्यवस्थेलाच उंदीर लागलेत का? असा उपरोधिक सवाल मंत्रालयात येणारा प्रत्येक जण करू लागला आहे.
आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी,बेरोजगार,पीडित, असे अनेक नागरिक आपले विविध प्रश्न घेवून दररोज तास ना तास मंत्रालयाबाहेर रांगा लावून उभे असतात.मात्र त्यांना सहज आतमध्ये प्रवेश मिळत नाही.अन मंत्रालयात आल्यावर न्याय मिळेल याची या लोकांना शाश्वती मिळत नाही.
खरं तर जनतेच्या कामाला विलंब होण्याच्या निषेधार्थ मंत्रालयाला अधूनमधून विरोधी पक्षाच्या आमदारांनी घेरावा किंवा वेढा घालणे अपेक्षित आहे.मात्र ही करामत “मूषक मंडळा”ने करून दाखविली आहे.
उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल,मोठ मोठ्या शासन निर्णयाचे जीआर,करोडो रुपयांच्या प्रस्तावांच्या फायलीचे ढिगारे मंत्रालयाच्या प्रत्येक दालनातील टेबलावर पडून आहेत.मात्र टेबलावरील फायलीच्या ढिगाऱ्यातून, भिंतीच्या फटीतून, डोकावणारे हे चिंटूकले -धिटुकले मूषक मंडळ दररोज गमिनी काव्याने मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या साम्राज्याच्या विरोधात जणू काय हल्ला करू लागले आहेत.
मंत्रालयाच्या मागील आरसा गेटच्या जवळ मोठा कचरा टाकण्याचा डेपो आहे.तिथे मंत्रालयातील संपूर्ण कचरा/रद्दी टाकला जातो.परंतु या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर सरकारी कर्मचारी दुपारचे भोजन झाल्यावर आजूबाजूला असलेल्या कचरा डब्ब्यात उरलेले किंवा खरकटं अन्न टाकतात.मात्र हे कचरा डब्बे वारंवार स्वच्छ करीत नसल्याने ह्या उंदराचा मोर्चा ह्या डब्ब्याकडे वळालेला असतो. दररोज हजारो लोकं भोजन करीत असलेल्या मंत्रालयाच्या उपहारगृह आणि चौरस आहार गृहाची सुद्धा तिच परिस्थिती आहे.या उपहार गृहात अनेक वेळा उंदीर इकडून तिकडे धावताना बघायला मिळतात. मंत्रालयात अनेक मजल्यावर नादुरुस्तीची कामं सुरू आहेत.त्यामुळे प्रत्येक मजल्यावर भंगार आणि अनावश्यक साहित्य पडलेले आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्या बाजूला जोरदार खोदकाम सुरु असल्याने त्या परिसरात उंदरांचा उपद्रव दिसून येतो. रात्रीच्या काळोखात उंदीर सर्रास ‘रात्रीचा खेळ चाले’प्रमाणे बिनधास्तपणे मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उड्या मारत असतात.
एक वेळेला मंत्रालयातील कामकाजाच्या वेळा थांबतील मात्र “मूषक मंडळाच्या”मूक अतिक्रमणाचा गवगवा येथे सर्वांचे लक्ष वेधून घेतो.अनेक वेळा मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका रद्द होतात.पण या मूषक मंडळाच्या बैठका रात्र ना दिवस अखंड सुरु आहेत.यांना प्रशासनाचा कुठेही अडथळा येते नाही.
फायलींना कुरतडणारे दात, टेबलावर गाजविणारे अधिकार, अन टेबलाखाली सळसळणारी या “मूषक मंडळा”ची संघटीत मोर्चे बांधणी दररोज एक नव्या खेळाचा डाव रंगवत असतात. सर्व सामान्य जनतेच्या कामापेक्षा उंदराच्या शेपटीची अधिक हालचाल दिसते. यामुळे हा उंदरांचा खेळ की,मंत्रालयातील प्रशासन व्यवस्थेची हार आहे.असा प्रश्न सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.