तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु करण्याचा संकल्प केला होता. या वाचनालयाचे अनौपचारिक उद्घाटन दि.18 सप्टेंबर, 2024 रोजी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड. जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस ऑफीसर संभाजीराव पाटणकर, प्रा.ए.बी.कणसे, देवबा वायचळ, ग्रामीण लेखक ज्ञानदेव मस्कर, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), नितीन पाटील, अक्षय पाटील, आप्पासोा निवडूंगे, जगन्नाथ टेळे, कृष्णा डाकवे (गुरुजी), विठ्ठल डाकवे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.
कागदपत्राची पूर्तता करत संदीप डाकवे यांनी सातारा विभागातील संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) या नावाचे संस्था नोंदणी प्रमाणपत्र सातारा धर्मादाय कार्यालयाचे अधिक्षक राजेंद्र दुधाळे, वरिष्ठ लिपीक आबासाहेब लांगोटे यांनी अध्यक्ष संदीप डाकवे, सेक्रेटरी रेश्मा डाकवे यांचेकडे सुपूर्द केले. नोंदणीकामी त्यांना पब्लिक ट्रस्टऑडीटर कराडचे कमलेश यादव, रुपेश देवरे, प्रा.ए.बी.कणसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी डाकवे परिवाराने गेली 7 वर्षापासून मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, साहित्य पुरस्कार, शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमात सहभागी, पुस्तक भेट अभियान, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, ग्रंथालयांना पुस्तके वितरण, पुस्तकांचं झाड, वार्तांकन स्पर्धा, एक अक्षरगणेशा संमेलनासाठी, वाढदिवसादिवशी पुस्तक प्रकाशन, वृत्तपत्र विक्रेते सन्मान, स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून वाचकांना व्यासपीठ असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्याला समाजातूून उदंड प्रतिसादही मिळाला आहे.
भविष्यामध्ये वाचन चळवळ वाढवण्यासाठी वृत्तपत्रलेखन, निबंध, चित्रकला, काव्य स्पर्धा, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा, मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, तात्याश्री साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी संमेलन, पुस्तक भेट अभियान असे विविध उपक्रम वाचनालयाच्या माध्यमातून राबवले जाणार असल्याचे मत संदीप डाकवे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल डाकवे, सेक्रेटरी रेश्मा डाकवे, खजिनदार संजय डाकवे, कार्यकारिणी सदस्य विकास डाकवे, भरत डकवे, प्रथमेश डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, चाफळ (ता.पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळील नामवंत लेखकांची 100 पुस्तके भेट दिली आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई आणि आ.जयंत पाटील यांनी लेख शुभसंदेश तर साताऱ्याचा चाॅकलेट हिरो आकाश पाटील यांनी व्हिडीओ क्लिप शेअर करत वाचनालयाला शुभेच्छा दिल्या आहेत. वडिलांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) या नावाने वाचनालय उभारले असल्याचे संदीप डाकवे यांनी म्हटले आहे. तर ग्रामीण भागात वाचन चळवळीसाठी पाऊल उचलेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
*चौकटीत : वाचनालयाच्या भौतिक सुविधेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन :*
वाचनालय व ग्रंथालयाच्या उभारणीसाठी कपाटे, टेबल, खुर्च्या, पुस्तके, संगणक इ.हून अन्य भौतिक बाबींची आवश्यकता आहे. त्या पुरवण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी वस्तूरुपी किंवा आर्थिक स्वरुपात सहकार्य करावे असे आवाहन संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.