प्रतिनिधी : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, शेतीतील पिकं, शेतजमीन, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जमाफी करावी व सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत असताना महायुती सरकार मात्र पैसे नाहीत ही सबब सांगत आहे तर दुसरीकडे मात्र जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारने ५३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्यातील मागास वर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाहीत. या विभागाचा निधी बेकायदेशीरपणे दुसऱ्या विभागाकडे वळवून दलित, आदिवासी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, असे असताना या विभागाला प्रसिद्धीचा हव्यास हवा कशाला. आधी ज्यांच्यासाठी हा पैसा आहे त्यांच्यासाठी खर्च करावा. विशेष म्हणजे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत, लाडक्या बहिणांना देण्यास पैसे नाहीत, संजय गांधी निराधार योजनेसाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिल थकलेली आहेत आणि सरकार मात्र जाहिरातबाजीवर उधळपट्टी करत आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.