पनवेल – जीवनदीप प्रकाशन मीडिया चे मॅनेजर डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ‘सुवर्णपथ – जीवनदीप ते ज्ञानदीप’ हा ग्रंथ आज एका भव्य सोहळ्यात प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन ऑइलचे माजी अधिकारी सुरेश केदारे, जीवनदी प्रकाशनचे प्रमुख जीत फुरिया, माजी पोलिस अधिकारी जाधव, इंटरनॅशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल, शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील, हास्य अभिनेते जॉनी रावत व विजय कदम, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव हे होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदार पनवेलकर, अनंता धरणेकर, कुमारी मानसी पोळ यांनी केले होते. प्रमुख पाहुणे सुरेश केदारे यांनी भाषणात डॉ. पोळ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना, “डॉ. गोरखनाथ पोळ यांनी माणसं जोडली आणि ती नातं जपत ठेवली हीच त्यांची खरी संपत्ती आहे,” असे सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जीवनदी प्रकाशनचे प्रमुख जीत फुरिया म्हणाले, “मागील २५ वर्षांपासून डॉ. पोळ हे जीवनदी प्रकाशनचा कणा आहेत. आम्ही जरी मालक असलो तरी आमच्या यशामागचे खरे श्रेय त्यांचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.इंटरनॅशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल यांनी “मित्र कसा असावा” यावर भाष्य करत मुंबई डबेवाल्यांचे उदाहरण दिले आणि त्यांच्या प्रतीकात्मक सायकल व डब्याची भेट देऊन डॉ. पोळ यांचा सन्मान केला. लेखिका स्मिता पनवेलकर यांनी मागील २७ वर्षांचा इतिहास सांगताना “डॉ. पोळ आमच्यासाठी फक्त सहकारी नसून भाऊसमान आहेत,” असे भावनिक शब्द उच्चारले.कार्यक्रमाला पोळ सरांचे मित्रपरिवार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेला हा सोहळा डॉ. पोळ यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी केले तर सुयश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी आभार मानले