मुंबई : सरकारकडून उभ्या करण्यात येणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण बांधकामात आता गिरणी कामगारांसाठी राखीव जागा ठेवा,अशी मागणी आपण नुकतीच सरकारकडे केली आहे,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे गिरणी कामगार मुलांच्या गुणगौरव सोहळ्याला बोलताना दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे आद्य संस्थापक आणि कामगार महर्षी स्व. गं.द.आंबेकर यांची ११८ वी जयंती परेलच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली.त्यावेळी अध्यक्षस्धानावरुन आमदार सचिन अहिर बोलत होते. समारंभाला दैनिक सकाळचे ब्युरो चीफ आणि वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गिरणी कामगार मुलांचा गं.द.आंबेकर शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.
सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले,गेल्याच आठवड्यात आपली राज्याच्या प्रधान सचिवांशी मंत्रालयात बैठक झाली असता, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनाची लवकरच तड लावण्यात यावी,अशी मागणी करून,या प्रश्नावरून गिरणी कामगारां मध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे,तो कमी होण्यासाठी वरील प्रमाणे मार्ग सुचविण्यात आला आहे,असे सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात सांगितले.दरम्यान आज १४ कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची मजदूर संघात आढावा बैठक पार पडली,त्या बैठकीतही सचिन अहिर यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.
गुणगौरव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेला विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करताना वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत म्हणाले, वाचाल तर टिकाल,या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रसंगावर मात करायची असेल तर आधी वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी लागेल आणि संवेदनशील व्हावे लागेल.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक आणि कायदे विषयक विषयावर विपुल अभ्यास केला होता, खूप वाचनही केले होते, म्हणूनच समोर येणाऱ्या अनेक प्रसंगावर ते यशस्वीरीत्या मात करू शकले आहेत.पालकांनी मोबाईलमध्ये गुंतून रहायचे आणि समोर मुलांना मात्र अभ्यास करा असे म्हणायचे, या गोष्टीने मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल? असा सवाल करून पत्रकार विनोद राऊत म्हणाले,तासंतास इंस्टाग्राम,व्हाट्सअप सारख्या समाज माध्यमांच्या विळख्यात गुरफटून रहाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तरी या फसव्या जाळ्यातून आपली सोडवणूक करून द्यावी आणि दिव्यत्वाची प्रचिती देणाऱ्या वाचन संस्कृतीकडे वळावे,त्यातच त्यांचे हित आहे,असा विचार पत्रकार विनोद राऊत यांनी येथे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात व्यक्त केला आहे.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,ऋषीतुल्य गं.द आंबेकर यांनी कामगार चळवळीतील आपले ध्येय गाठण्यासाठी कामगार सेवेचे व्रत अंगीकरले आणि महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विधायक मार्ग अनुसरला, त्यामुळेच त्यांना आपले नाव अजरामर करता आले आहे.याप्रसंगी टाटा स्टील कंपनीतील कामगार संतोष बैलमारे यांनी सरपंचापर्यंत यशस्वी मजल मारली,त्याबद्दल त्यांचा अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.आजच्या समारंभात जवळपास ६० दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सुमारे दोन लाख रुपयांवर आंबेकर शैक्षणिक साहाय्याने गुणगौरव करण्यात आला. यामध्ये गिरणी कामगारांच्या ८० टक्के गुणावरील दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच उच्चशिक्षित नातवंडाचा
समावेशआहे.
आभाराचे भाषण संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. सर्वश्री अण्णा शिर्सेकर,राजन लाड सुनिल अहिर,उत्तम गीते,सुनिल बोरकर,संजय कदम, मिलिंद तांबडे,जी. बी.गावडे,आंबेकर कॅटरिंग कॉलेजच्या प्राचार्य वैशाली हेगडमल,रमाकांत बने आदी कामगार नेते त्यावेळी उपस्थित होते.
सर्व गृहनिर्माण बांधकामात गिरणी कामगार घरांसाठी जागा राखीव ठेवा! सचिन अहिर यांची सरकारकडे मागणी
RELATED ARTICLES