कराड(प्रताप भणगे) : घोगाव गावच्या हद्दीत साई सिद्धी पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू झाला. ही घटना पाहणाऱ्यांच्या हृदयाला चटका लावणारी ठरली आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारास रस्त्यालगत मोर फिरत असताना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मोर जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृत मोराचा ताबा घेतला. राष्ट्रीय पक्ष्याचा असा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी स्पीड ब्रेकर, वेग मर्यादा चिन्हे लावण्याची आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.