Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रबेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी, राष्ट्रीय कर्मचारी...

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून जल्लोष

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) : मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता असताना उबाठाने बेस्ट कामगारांसाठी काही केलं नाही,याउलट कंत्राटी पद्धतीने नवीन बस,कामगारांची भरती करुन मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टला खड्ड्यात घातले,अशी घणाघाती टीका शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली.बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेने संतोष चतुर आणि राजेंद्र गोरे हे दोन उमेदवार निवडून आले.यानिमित्त पेढे वाटून आणि ढोलताशे वाजवत जल्लोष करण्यात आला.
मराठी म्हणून गळा काढणाऱ्यांना बेस्टमधील मराठी कामगारांनी जागा दाखवली, अशी खरमरीत टीका पावसकर यांनी केली.मुंबई आणि महाराष्ट्रात एकच ब्रॅंड आहे तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे,असे ते म्हणाले.दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनलच्या नेतृत्वात राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून पाच उमेदवार देण्यात आले होते.त्यात संतोष चतुर आणि राजेंद्र गोरे यांचा विजय झाला असून सुधीर पाटील आणि उत्तम माने यांचा थोडक्यात पराभव झाला.अवघ्या तीन वर्षात राष्ट्रीय कर्मचारी सेनेला मिळालेलं यश हे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे,असे पावसकर म्हणाले.मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला.शिंदे यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी निर्णय घेतले.मात्र ज्यांच्याकडे २५ वर्ष महापालिकेची सत्ता होती त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले.बेस्टच्या कामगार वसाहतींची दुरवस्था झाली.बेस्टमध्ये कंत्राटीपद्धतीने बस आणल्या,हजारो कर्मचाऱ्यांची भरती केली.हे सर्व चार कंत्राटदारांकडून करण्यात आले ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा गौप्यस्फोट पावसकर यांनी केला.ते पुढे म्हणाले की मागील २५ वर्षात २१ कंत्राटदारांना मुंबई महापालिकेची कामे देण्यात आली.यातील १६ ते १८ काळ्या यादीतील असून सर्व अमराठी आहेत.निवडणुका आल्या की मराठीबाबत गळे काढायचे आणि कंत्राटे अमराठी मित्रांना द्यायची, अशी टीका पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
पावसकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वरळीतील मच्छिमारांचे प्रश्न सोडवले, त्यांना १३२ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे काम केले. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आणि त्यांचे वडिल मुख्यमंत्री असतानाही मच्छिमारांचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत, असा सवाल पावसकर यांनी केला. मिठी नदीचा गाळ उपसण्यासाठी अभिनेता दिनो मोरिया याला कोणत्या आधारे कंत्राट देण्यात आले, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments