मुंबई : वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) मुंबई आणि श्रीलंका वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत झालेल्या श्रीलंका व्यापार प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यामुळे भारत-श्रीलंका व्यापार सहकार्याला नवे बळ मिळाले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात WTC मुंबईच्या ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन संचालिका सौ. प्रिया पानसरे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी जागतिक भागीदारी दृढ करण्यासाठी WTC मुंबईचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि श्रीलंका वाणिज्य दूतावास तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर श्रीलंका वाणिज्य दूतावासाच्या कार्यवाहक वाणिज्य दूत सौ. शिरानी अरियारत्न यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी WTC मुंबईच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्रीलंकेच्या प्रमुख निर्यात वस्तू – चहा, मसाले आणि मूल्यवर्धित उत्पादने – यांचा विशेष उल्लेख केला. सौ. शिरानी यांनी सांगितले की, ‘सिलोन चहा’ हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारतात त्यासाठी विशेष कोटा असला तरी त्याची संपूर्ण क्षमता अद्याप साध्य झालेली नाही. भारत-श्रीलंका मुक्त व्यापार करारातील करसवलतींचा लाभ घेऊन भारतीय बाजारपेठेत श्रीलंकन उत्पादनांना मोठ्या प्रमाणात वाव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी भारतातील खाद्यपदार्थ व पाककला उद्योगातील मसाल्यांच्या मोठ्या वापरावर प्रकाश टाकला आणि दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांसाठी उज्ज्वल संधी असल्याचे सांगितले. श्रीलंका वाणिज्य दूतावास व्यापार प्रोत्साहनासाठी आणि माहितीपुरवठ्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमात श्रीलंकेतील तीन नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला – टीटॉक (प्रतिनिधी : श्री. चमारा उदुगामा, संस्थापक/संचालक), जनरिच फूड्स लिमिटेड (प्रतिनिधी : श्री. जनिथ अबेयसेकरा, संचालक) आणि न्यू लंका ग्लोबल प्रा. लि. (प्रतिनिधी : श्री. नुवान गुणसेकरा, मार्केटिंग डायरेक्टर).
या प्रतिनिधींनी आपल्या उत्पादनांचा आढावा देत भारतात नव्या व्यावसायिक संधींचा शोध घेण्याबाबत उत्साह व्यक्त केला.
या दौऱ्यात झालेल्या व्यावसायिक चर्चांमुळे भारत-श्रीलंका यांच्यातील व्यापार सहकार्य अधिक दृढ होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.