प्रतिनिधी(रमेश औताडे) : सामान्य माणसाला गुलाम केले आहेच.आता संविधान बदलण्याचे काम सुरू आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी गांभीर्याने विचार करावा.असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ” आम्ही भारतीय ” या समूहाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ,पोलिस समन्वय समितीचे डोल्फी डिसुझा, समाजसेवक शरद कदम, रिपाई नेते शाम दादा गायकवाड, अर्जुन डांगळे, तिस्टा
सटेलवाड,फिरोज मिठीबोरवाला, इरफान इंजिनिअर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानाची मोडतोड करण्याचे काम २०१४ पासून सुरू झाले तर २०१९ पासून हे भारतीय संविधान उद्ध्वस्त करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. राक्षसी बहुमत त्यासाठी त्यांना हवे आहे. त्यांचे नेते उघडपणे संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत असे तुषार गांधी म्हणाले.
लोकशाहीच्या रक्षणासाठी बनविण्यात आलेल्या अधिकतर संस्था कमजोर केल्या जात आहेत म्हणून २०२४ ची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही तसेच लोकशाही मधील अधिकार वाचवण्याची निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही राजवट येणार याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे असे तिस्टा सटेलवाड म्हणाल्या.
लोकशाहीच्या बाजूने उभे राहण्या ऐवजी इथला काही भांडवलदारी मीडिया सरकारच्या नादाला लागलाआहे. काही प्रकरणात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टावर दबाव आणत आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला अनुकूल भूमिका बजावत आहे. राज्यपाल सत्ताधारी पक्षासाठी काम करीत आहेत. इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सरकारी संस्था सत्ताधान्यांच्या कार्यकर्त्या प्रमाणे काम करीत आहेत. विरोधकांना नामशेष करण्यासाठी आणि नागरिकांना वेठीस धरण्याकरीता या संस्थाचा उपयोग केला जात आहे.असे डोल्फी डिसुझा म्हणाले.
लोकांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. लोकांच्या प्रश्नावर, महागाई, रोजगार, शिक्षण, विकासाच्या प्रश्नावर निवडणुका लढविण्या ऐवजी मंगळसूत्र, मुस्लिम, पाकिस्तान या विषयावर लोकांचे लक्ष वळविण्यात येत आहे. धर्माधता, जातीयता आणि प्रांतवादावर भर दिला जात आहे. मुंबईत मराठी माणसाने नोकरी साठी अर्ज करू नये अशी जाहिरात असेल किंवा आमच्या सोसायटीत मराठी माणसाने घर घेऊ नये किंवा प्रचाराला येऊ नये असा भाषिकवाद जोपासला जात आहे.असे शाम दादा गायकवाड म्हणाले.
महाराष्ट्रात डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे यांच्या हत्येचा शोध लागलेला नाही अजूनही कोर्टात ते प्रकरण आहे. अनेक निरपराध नागरिक तुरुंगात खितपत पडलेले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात असंतोष आहे. शेतमालाला दाम नाही शेतकरी चिंतेत आहे. बेरोजगारांना काम नाही महागाई प्रचंड वाढलेली आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढत आहेत. जल, जंगल आणि जमीन यांची ही लढाई आहे. शहरातील मोल मजुरी करणारा कष्टकरी, इथला कोळी बांधव, आदिवासी आपली दररोजच्या जगण्याची लढाई लढत आहेत. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मग ती रेल्वे असो किंवा बस व्यवस्था असो तिची चिंताजनक स्थिती आहे असे इरफान इंजिनिअर म्हणाले.
लोकांना गारेगार प्रवास नको तर सुस्थितीतील प्रवास हवा आहे. नियमित लोकल वाढवण्या ऐवजी एसी गाड्या वाढवल्या जात आहेत कोकणात प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नाडीस यांच्या मुळे रेल्वे मिळाली परंतु कोकणातील प्रवाशांना रेल्वे प्रवास सुखकर मिळू शकत नाही. मुंबई गोवा महामार्ग 13 वर्ष झाली तरी पूर्ण होवू शकला नाही या तेरा वर्षातील दहा वर्ष एकच माणूस रस्ते वाहतूक खात्याचा मंत्री आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदानाला उतरले पाहिजे असे आवाहन यावेळी ” आम्ही भारतीय ” या समूहाच्या वतीने करण्यात आले.