मुंबई(रमेश औताडे) : सरकार आणि एलआयसीकडून आयडीबीआय बँकेतील प्रस्तावित हिस्सा विक्रीला विरोध करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईजने शनिवारी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले.
नफा मिळवणाऱ्या आणि पुनरुज्जीवित झालेल्या संस्थेला खाजगी कंपन्यांना विकल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. आयडीबीआय बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ७५१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवून उल्लेखनीय वसुली केली आहे. या क्षेत्रातील सर्वोत्तम बँकांपैकी एक बँकेची नफा क्षमता आणि आर्थिक उलाढाल चांगली असताना बँकेचे खाजगीकरण करण्यामागील राजकारणावर असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
असोसिएशनने या निर्णयाला वित्तीय न्याय, आर्थिक स्वायत्तता आणि आत्मनिर्भर भारताच्या आदर्शांसाठी धोका असल्याचे यावेळी सांगत सरकारला निर्गुंतवणुकीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलन तीव्र करण्यासाठी ११ ऑगस्ट २०२५ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
यावेळी ऑल इंडिया आयडीबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष कॉम्रेड सौरव कुमार यांच्यासह युनायटेड फोरमचे संयोजक देवीदास तुळजापूरकर, विठ्ठल कोटेश्वर राव आणि युनायटेड फोरमचे संयुक्त संयोजक रत्नाकर वानखेडे उपस्थित होते.