मुंबई -आज धारावी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व थाटात साजरा केला. मोठ्या संख्येत सर्व गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या प्रसंगी कोळीवाड्यातील तरूण तरूणीं पारंपारिक वेशात मिरवणुकीत सहभागी झाली होती.
सोन्याचा नारळ परंपरे प्रमाणे गावाचे मडवी निलेश कोळी यांनी धारावी खाडीत (माहीम खाडी) अर्पण केला. या मिरवणूक सोहळ्याचे आयोजन धारावी कोळी जमात ट्रस्ट चे अध्यक्ष डाॅमणिक किणी, सचिव दिगंबर कोळी,खजिनदार रवींद्र कोळी
गाव पाटील अजित पाटील, संदिप पाटील, उपाध्यक्ष इग्नेशिएस कोळी,उपसचिव अमीत कोळी, सभासद आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख जोसेप कोळी आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ यांनी केले होते. धारावी कोळी जमात ट्रस्टचे योग्य नियोजन या मिरवणुकीत पहायला मिळाले.
तसेच धारावी कोळी जमात ट्रस्ट स्व खर्चाने अर्बझ (URBZ)या संस्थेच्या वतीने धारावी बंदराचे सुशोभिकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यात बंदरातील मच्छिमार बांधवांच्या होड्या, गणपती विसर्जना करिता कृत्रिम तलाव व सांस्कृतिक कार्यक्रमाची मोकळी वहिवाटेतील जागा यांचा समावेश आहे.धारावी बंदराला 50 वर्षांपूर्वीचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्याचा विश्वास यावेळी धारावी कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष डाॅमणिक किणी यांनी मिरवणूकीच्या सांगता कार्यक्रमा दरम्यान धारावीतील कोळी बांधवांना संबोधित करताना व्यक्त केला आहे.