कराड(प्रताप भणगे) : राखी फक्त भावालाच नाही, तर आपल्या जीवनरक्षक निसर्गालाही – असा सुंदर विचार घेऊन श्री निनाई देवी विद्यालयातील विद्यार्थिनींनी यावर्षी रक्षाबंधनाचा सण झाडांना राखी बांधून साजरा केला.
“वृक्ष लगाओ, देश बचाओ” असा नारा देत विद्यार्थिनींनी वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा महत्वाचा संदेश दिला.
भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीचं नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचा रक्षक असतो, त्याचप्रमाणे निसर्गही मानवाचा खरा रक्षक आहे — तो अन्न, पाणी, हवा यासारख्या जीवनावश्यक गोष्टी विनामूल्य देतो. याच भावनेतून विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून निसर्गाशी भावनिक नातं प्रगट केलं.
कार्यक्रमात श्री आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, अस्मिता पाटील, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदूषण, हवामान बदल आणि त्यातून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींवर चर्चा करताना, निसर्ग रक्षणाच्या महत्त्वावर भर देण्यात आला.
“आज निसर्ग वाचवला, तर उद्याचं भविष्य सुरक्षित राहील” हा बोध समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.