मुंबई : मुंबईत आज डोगरा समाजाचा आक्रोश बघायला मिळाला. त्यांनी “जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने मुंबई प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत दिला.
डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. संतप्त निधी डोगरा यांनी सरकारला जाब विचारत म्हटले की, “ज्या उर्दू भाषेचे भाषिक जम्मू-काश्मीरमध्ये अवघे ४.५ टक्के आहेत, ती भाषा प्रशासन तेथील नागरिकावर लादली जात आहे. डोगरी, काश्मीरी, हिंदी आणि इंग्रजीसारख्या स्थानिक व सार्वत्रिक भाषांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”
कलम ३७० हटवूनही न्याय मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही आम्हाला समानतेच्या स्वप्नात अडकवून, भाषेच्या आधारे पुन्हा भेदभाव करत आहेत.” असा घणाघात करत डोगरा समाजाने सरकारच्या धोरणांवर थेट बोट ठेवले आहे.
डोगरा समाजाने “आमचं अस्तित्व, आमची भाषा, आमची ओळख… कुणाचं खाजगी राजकारण नव्हे!” असे ठणकावून सांगितले आहे.. या पत्रकार परिषदेनंतर राज्य व केंद्र सरकारवर डोगरा समाजाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.