मुंबई प्रतिनिधी : प्रायोगिक नाट्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! धगधगत्या मुंबईत आता रंगभूमीवर नवचैतन्य निर्माण होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची धडक घोषणा करण्यात आली असून, आता येथे दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे!
प्रायोगिक रंगभूमीला बळ देणारा हा उपक्रम म्हणजे नवोदित रंगकर्मींसाठी एक सुवर्णसंधीच. दर्जेदार नाट्यप्रयोगांचे मोफत सादरीकरण, रसिक प्रेक्षकांसाठी मुक्त प्रवेश आणि प्रयोगशील कलाकारांना भक्कम व्यासपीठ – अशा त्रिसूत्रीवर ‘नाट्य शुक्रवार’ सज्ज झाला आहे.
लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, दिग्दर्शक-अभिनेते रविंद्र देवधर, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि ज्येष्ठ पत्रकार नयना रहाळकर यांनी दिली.
या उपक्रमाचा पहिला पडदा उघडणार आहे २५ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता. उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख डॉ. अभिषेक कुमार यांची उपस्थिती लाभणार आहे.
“नव्या नाट्यप्रयोगांना हक्काचं व्यासपीठ देणं आणि मराठी रंगभूमीचा आशयसमृद्ध वारसा पुढे नेणं, हा आमचा हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांची संस्था नसून समाजातील सर्जनशीलतेला चालना देणारं केंद्र बनावं, ही आमची भूमिका आहे,”
— संदीप चव्हाण, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ
या उपक्रमाला इंडियन ऑईलचे प्रायोजकत्व लाभल्याने त्याला आणखी बळ मिळाले आहे. नाट्यरसिक, रंगकर्मी आणि समाजमन यांच्यातील बंध अधिक घट्ट करणारा हा प्रयोग रंगभूमीवर नवीन पर्व सुरू करेल, अशी खात्री व्यक्त होत आहे.
तर, ‘नाट्य शुक्रवार’ला सज्ज व्हा – आणि रंगभूमीवर नवा प्रकाशझोत अनुभवायला विसरू नका!