मुंबई : राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करार या अभिनव संकल्पनांच्या आधारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली असून, यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते, धर्मादाय रुग्णालये आणि रूग्ण यांच्यात सामंजस्य निर्माण करून मदतीचा मार्ग मोकळा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी “दिलखुलास” मध्ये मुलाखत देताना ही माहिती दिली.
त्रिपक्षीय सामंजस्य करारातून थेट मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कार्पोरेट कंपन्या आणि रुग्णालय यांच्यात लवकरच त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार असून, रूग्णांकडूनही काही प्रमाणात योगदान अपेक्षित आहे. या भागीदारीतून गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार मिळतील.
क्राउड फंडिंगसाठी स्वतंत्र पोर्टल
राज्यातील अशा रुग्णांसाठी, ज्यांचा उपचार खर्च १० लाखांहून अधिक आहे, विशेषतः दुर्धर व गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी क्राउड फंडिंग उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले असून, तीन महिन्यांच्या आत ते कार्यान्वित होणार आहे. या पोर्टलवरून गरजू रुग्ण थेट मदतीसाठी अर्ज करू शकतील.
एफसीआरए मान्यता – परदेशी मदतीचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला नुकतीच FCRA (Foreign Contribution Regulation Act) मान्यता मिळाली असून, त्यामुळे आता परदेशातील दाते, CSR कंपन्या आणि संस्था थेट निधी देऊ शकतात. हे प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
धर्मादाय रुग्णालयांचा महत्त्वपूर्ण सहभाग
धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या खाटांपैकी १०% खाटा वार्षिक उत्पन्न १.८० लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांसाठी मोफत, तर १०% खाटा ३.६० लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात राखीव ठेवाव्या लागतात. या व्यवस्थेमुळे गरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अर्ज व मार्गदर्शनासाठी टोल फ्री सेवा
या योजनेंतर्गत मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
छोट्या कालावधीत मोठा प्रभाव
१ जानेवारी ते ३० जून २०२५ या सहा महिन्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत १४,६५१ रुग्णांना १२८.६६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. तसेच, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून २ लाख ३२ हजारांहून अधिक रुग्णांना १६५.०४ कोटी रुपयांची मदत मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून संकल्पनेची अंमलबजावणी
गरिबांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपचार मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या नव्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली.