प्रतिनिधी :नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोक कंटाळले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अनेक भागात प्रचारही करु दिला जात नाही. सर्वसामान्य जनेतमध्ये मोदी सरकारने फसवले असल्याची भावना तीव्र आहे. नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची घोर निराशा केली आहे. जी जनता २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आणू शकते तीच जनता २०२४ च्या या निवडणुकीत भाजपाचा पराभवही करु शकते, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व मुंबई उत्तर मध्यच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु असून इंडिया आघाडीचे मेळावे घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला जात आहे. शिवसेना शाखांना भेटी देणे, चौक सभा घेऊन स्थानिक जनतेशी संवाद साधला जात आहे. वर्षा गायकवाड मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. सांताक्रुज, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या चुनाभट्टी येथील निवासस्थानी भेटून आशीर्वाद घेतले, यावेळी लिलाधर डाके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाबरोबरच दक्षिण मध्य मतदारसंघातही वर्षा गायकवाड यांचे मेळावे व भेटींचा कार्यक्रम सुरु आहे. वर्षा गायकवाड यांनी आज वांद्रे भागातील कलानगर, वाकोला, सांताक्रूज पूर्व या भागातील जनतेशी संवाद सादला तर वांद्रे पूर्व, पश्चिम व कुर्ला पूर्व या भागातील जनतेशी संध्याकाळी संवाद साधला.