मुंबई – धारावीतील शताब्दी नगर, आंबेडकर नगर परिसरातील 250 पात्र झोपडीधारकांनी स्थलांतरासाठीचे चाळीस हजार रुपये भरणा केला असताना त्यांना निवासी व्यवस्थेत सामावून घेतलेले नाही. आंदोलने होऊनही अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तातडीने कारवाई करा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, याकडे आज विधानसभेत धारावीच्या काँग्रेस सदस्य ज्योती गायकवाड यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले.
सदस्य ज्योती गायकवाड म्हणाल्या, या गंभीर विषयावर बैठक होऊन आश्वासनेही देण्यात आली. मात्र अंमलबजावणी नाही. पुनर्विकास प्रकल्प अधिकारी यांना अनेकदा वस्तुस्थिती सांगूनही ते निवासासाठी असलेल्या निवासव्यवस्थांची या 250 झोपडीधारकांसाठी व्यवस्था करत नाहीत. ते स्वतः कार्यालयात जागेवर नसतात. अदानी घरे देऊ शकत नाहीत, अशी लोकांची भावना होत आहे.
ज्योती गायकवाड म्हणाल्या, या 250 झोपडीधारकांना रखडवून मध्येच अनेक झोपड्यांचे स्थलांतर कसे झाले, त्याचे डेब्रिज मध्येच पडून आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. लोकांत असंतोष आहे. तातडीने लोकांना न्याय द्यावा. यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले, त्याचीही उत्तरे अद्याप नाही.