कराड(विजया माने) : प्रज्वल कांबळे, मुख्य कार्यकारी अभियंता, महापारेषण, विजय नगर, कराड (जि. सातारा) यांना विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडून त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली असून, अन्यथा सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांची महापारेषण सप्लाय लाईन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
- शिराळा नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडण्यास कायदेशीर परवानगी मिळावी.
- पुरुष शोषण विरोधी कायदा लागू करण्यात यावा.
- CGTMSE योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना ५०% सबसिडीमध्ये बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे.
- रस्ते अपघात रोखण्यासाठी गतिरोधक कायदा लागू करण्यात यावा.
- कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधने रद्द करण्यात यावीत.
- अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा द्यावा.
- शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर ॲक्ट लागू करावा.
सदर निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिमराव माने (शिराळा), चंद्रकांत पवार (संस्थापक अध्यक्ष, शिवराष्ट्र युवक संघटना, महाराष्ट्र राज्य), विजय पाटील व अशोक पाटील (शेतकरी संघटना), गणपती माने, अनिल जाधव (शिवराष्ट्र युवक संघटना) इ. पदाधिकारी उपस्थित होते.
या मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असून, दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.