प्रतिनिधी : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील मतदारसंघात वातावरण तापलं आहे. महायुतीमध्ये काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जागांवरील उमेदवारांची घोषणा रखडली होती. काल दिवसभरात शिंदे गटाने वायव्य मुंबईमधून रवींद्र वायकरांना उमेदवारी दिली, तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित केली. काल काँग्रेसने उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचे सर्व पक्षांचे उमेदवार ठरले आहेत. त्यामुळे मुंबईतील लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघात सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही मुंबईतील सर्व मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने मंगळवारीच काही जागांवरील उमेदवार जाहीर करत यंदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट केलं आहे.
यासंहित महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फायनल झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गट २१ जागा, काँग्रेस १७ शरद पवार गट १० जागा लढवत आहे. तर महायुतीमध्ये भाजप २८ जागा, शिंदे गट १५ आणि अजित पवार गट ४ जागा लढवणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुंबईतील उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपांचा फॉर्म्युला फायनल झाला आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
महायुती – पियुष गोयल
पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच ते राज्यसभा खासदार आहेत.
महाविकास आघाडी – भूषण पाटील
या मतदारसंघात काँग्रेसकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी ऑफर केली होती, मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
महायुती- मिहिर कोटेचा
या लोकसभा मतदारसंघातून भाजपने आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी सर्वांच्या आधी प्रचाराचाला सुरुवात केली.
महाविकास आघडी – संजय दिना पाटील
या लोकसभा मतदासंघात ठाकरे गटाने संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते आधी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटाला साथ दिली. ते २००४ साली भांडूपचे आमदार होते. २००९ मध्ये ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
महाविकास आघाडी – अमोल कीर्तीकर –
अमोल कीर्तिकर हे युवासेनेचे सेक्रेटरी आहेत. तसेच ते विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत. अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले.
महायुती – रवींद्र वायकर
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय ओळख असलेले रवींद्र वायकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. ते जोगेश्वरीचे आमदार आहेत. त्यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
महायुती – अॅड. उज्ज्वल निकम
भाजपने या लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांच्या ऐवजी माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली. मतदारसंघातून आशिष शेलार यांनी उमेदवारी नाकारली, त्यानंतर भाजपने निकम यांना उमेदवारी दिली.
महाविकास आघाडी – प्राध्यापक वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड यांनी चार वेळा विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छूक होत्या. मात्र, काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभातून उमेदवारी मिळाली.
दक्षिण मध्य मुंबई
महाविकास आघाडी – अनिल देसाई
अनिल देसाई हे राज्यसभा खासदार आहेत. पक्षाच्या पडद्यामागे राहून काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
महायुती – राहुल शेवाळे
राहुल शेवाळे हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारत खासदार झाले.