सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील छत्रपती शाहू महाराज स्टेडियम या ठिकाणी होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
साताऱ्यात मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्या वतीने हे साहित्य संमेलन होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, शाहूपुरी शाखेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, महेश सोनावणे, उद्योजक प्रसन्न देशमुख, अमोल मोहिते, अक्षय गवळी, राजेश जोशी, वेदांत जोशी आणि मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात वडील स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले आणि मुलगा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होण्याचा योग साताऱ्यात होणाऱ्या संमेलनात जुळून आला आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी दिली.
थंडीच्या महिन्यात साहित्यिकांना साताऱ्यात साहित्य उब देणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने सातारकरांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. गप्पा, गोष्टी , परिसंवाद,कवी संमेलन, साहित्यिक चर्चा, पुस्तक व कवितासंग्रह प्रकाशन, मनोरंजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात येणार आहे. देशी- विदेशातील मराठी साहित्यिक या निमित्त ऐतिहासिक नगरी साताऱ्याला भेट देणार आहेत. समाजातील मराठी साहित्य प्रेमी अनेक दानशूर व्यक्तींनी या साहित्य संमेलनासाठी आपले बौद्धिक व आर्थिक योगदान देण्यास सुरुवात केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक साहित्यकांनी आपल्या साहित्यातून सात समुद्रापलीकडे मजल मारलेली आहे. तसेच सध्या नव्या दमाची ही साहित्यिक निर्माण होत आहेत. एकूण सातारा शहरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे खऱ्या अर्थाने बत्तीस वर्षांनी पुन्हा एकदा साहित्यिक दिंडी पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही साहित्य संमेलनामध्ये सक्रिय सहभाग घेणारे अनेक जण यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
_____________________________
फोटो — अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना बाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करताना मंत्री व स्वागताध्यक्ष व मान्यवर
(छाया-अजित जगताप, मुंबई)