मुंबई(भीमराव धुळप) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज गुरुवार, २६ जून रोजी धारावीतील मुकुंदनगर बुद्ध विहार मैदानात नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देत जागरूक करण्यात आले. कार्यक्रमात माजी नगरसेवक वसंत नकाशे, उपविभागप्रमुख जोसेफ कोळी, शाखाप्रमुख किरण काळे, शाखा समन्वयक संतोष पोटे, सतीश सोनवणे, बाळा घाडीगावकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या संवादात सरकार आणि अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास योजनेविषयी गंभीर शंका उपस्थित करत, येणाऱ्या काळात धारावीकरींच्या हक्कांवर गदा येऊ शकते, असा इशारा देण्यात आला. धारावी बाहेर नागरिकांना हटविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे सांगत, या विरोधात आवाज उठवण्याचे आणि एकजुटीने लढण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आणि पुनर्वसन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.