बॉम्बे प्रोव्हिन्स, मुंबई प्रांत, मुंबई इलाखा, मुंबई द्विभाषिक राज्य असा प्रवास करीत करीत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र लढा जोरात उभारण्यात आला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एकशे सात बहाद्दरांनी हौतात्म्य पत्करले आणि १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली परंतु बेळगांव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर सह ८६५ मराठी भाषिक गावे कर्नाटकातच राहिली. मुंबई महाराष्ट्रात आली, राजधानी झाली. परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही, मुंबईत मराठीला दुय्यम स्थान मिळाले. म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी मार्मिक हे जागतिक पातळीवरचे पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केले. या मधून अमराठी अधिकाऱ्यांची यादी ‘वाचा आणि थंड बसा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करायला सुरुवात केली. यामुळे मराठी माणसात जागृती निर्माण होऊ लागली. तीर्थस्वरुप दादा म्हणजे केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारले की बाळ, पुढे काय करायचं ठरवलंय ? बाळासाहेब म्हणाले, दादा, मराठी तरुणांची संघटना काढायचा विचार आहे. दादा म्हणाले, काढ, संघटना काढ आणि त्या संघटनेला नांव दे ‘शिवसेना’. ठरलं. शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली. ही लढाऊ बाण्याची संघटना आज हीरक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अनेक उन्हाळे, पावसाळे या संघटनेने पाहिले असून काटेरी मार्गावरुन यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली आहे. अनेक आले आणि गेले पण बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर ही संघटना भरभक्कम पणे भविष्याचा वेध घेण्यासाठी झेपावली आहे. १९ जून १९६६ पासून शिवसेनेने अनेकांना सोबत घेऊन वाटचाल करतांना परिणामांचा मुलाहिजा बाळगला नाही. यशवंतराव चव्हाण यांनी सनदी अधिकारी स. गो. बर्वे यांना १९६७ साली कॉंग्रेस पक्षात आणून इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उभे केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कृष्ण मेनन यांच्या विरोधात उभ्या असलेल्या स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. हे बर्वे कॉंग्रेसचे होते. त्यावेळी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ ही घोषणा गाजली होती. दुर्दैवाने स. गो. बर्वे यांचे निधन झाले आणि मग ताराबाई सप्रे या बर्वे भगिनी कॉंग्रेस तर्फे पोटनिवडणुकीत उभ्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनाही समर्थन दिले होते. १९६८ साली मुंबई महापालिका निवडणुकीत मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती. मुस्लिम लीगच्या जी. एम. बनातवाला यांच्या बरोबरही बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती. वरळीला आदित्य ठाकरे यांना आव्हान देणारे मिलिंद देवरा यांचे तीर्थरूप मुरलीभाई देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बाळासाहेब ठाकरे यांनी बसविले. या मुरलीभाईंनी तब्बल २२ वर्षे मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. पहिल्या महिला मराठी राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई देविसिंह शेखावत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांनी भरभक्कम पणे पाठिंबा दिला होता. या बद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव (आर आर) पाटील हे दोघे मातोश्रीवर आले होते. कॉंग्रेसचे चाणक्य समजण्यात येणारे प्रणव कुमार मुखर्जी यांना पाठिंबा देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राष्ट्रपती पदी निवडून येण्यासाठी बहुमोल योगदान दिले. शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात झालेले मार्गदर्शन अजूनही लोक विसरलेले नाहीत. १३ ऑगस्ट १९६० रोजी मार्मिक या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिक चे प्रकाशन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले होते. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर पहिल्या दसरा मेळाव्यात बॅरिस्टर रामराव आदिक व्यासपीठावर उपस्थित होते. १९८७ साली विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम हिंदुत्वाचा मुद्दा घेत डॉ. रमेश प्रभू यांना उभे केले त्या विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता तर शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला असल्याने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांना समर्थन दिले होते. या हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षे हिरावून घेतला होता तर रमेश प्रभू यांची आमदारकी रद्दबातल ठरवली होती. जेंव्हा शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विलेपार्ले पोटनिवडणुकीत विजयी झाली तेंव्हा भारतीय जनता पक्षाचे चाणक्य प्रमोद व्यंकटेश महाजन यांनी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना साकडे घातले. १९८९ लोकसभा आणि १९९० विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र लढले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई मधून निवडून आलेल्या शिवसेना भाजप युतीच्या आमदारांविरोधात कॉंग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी मनुभाई वशी आणि मुकेशभाई वशी यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केल्या. या निवडणुकीत गिरगांव चौपाटीवर झालेल्या विराट प्रचार सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराथी, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही तर आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे”,अशी हिंदुत्वाची व्याख्या ठणकावून सांगितली होती. गिरगांव चौपाटीवर झालेल्या सभेचे वृत्तांकन दैनिक सामना साठी मी केले होते म्हणून मला वशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात साक्षीदार म्हणून बोलावले होते. साक्षीदार म्हणून अंबरनाथ येथून मुंबई उच्च न्यायालयात पाच वर्षे चकरा माराव्या लागल्या. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या मनोहर जोशी यांच्या खटल्यात मनोहर जोशी यांचे वकील जय चिनॉय यांनी माझ्या तोंडून शिताफीने रेकॉर्डवर आणली, एवढेच नव्हे तर ही व्याख्या प्रसिद्ध झालेल्या दैनिक सामनाच्या विविध अंकांचे न्या. सॅम वरियावा यांच्या न्यायालयात सादरीकरण केले. याच आधारावर सर्वोच्च न्यायालयात ११ डिसेंबर १९९५ रोजी न्या. जे. एस. वर्मा यांनी मनोहर जोशी यांना हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद धराशायी झाल्यावर पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांना, “बाबरी किसने गिरायी ?”, असे विचारताच त्यांनी काखा वर करीत, “नहीं वे बीजेपी के नहीं थे, आरेसेस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हिएचपी के नहीं थे”, असे उत्तर दिले. पुन्हा पत्रकारांनी त्यांना विचारता ते म्हणाले,”शायद वे शिवसेना के होंगे”. याच वेळी वांद्रे येथून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकच डरकाळी फोडली की, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी उद्ध्वस्त केली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. यावर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी बाबरी मशीद धराशायी होतांनाची छायाचित्रे असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली आणि “गर्व से कहो हम हिंदू हैं |” असे ठळकपणे छापले. त्यावर बंदी घालण्यात आली. यानंतर मुंबई महाराष्ट्रात दंगल पेटली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने तमाम हिंदू आणि मराठी बांधवांना वाचवण्यासाठी ढाल म्हणून संरक्षण दिले. या शिवसेनारुपी रक्षा कवचामुळे प्रभावित होऊन गुजराती बांधवांनी गिरगांव चौपाटी जवळ सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांना सन्मानित केले आणि हिंदुहृदयसम्राट असे संबोधून गौरव केला. तेंव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे रुढ झाले. ५ डिसेंबर १९९१ रोजी छगन भुजबळ १५ आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे बाहेर पडले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकट्या हाताने निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवून देती जाहली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकहाती ६३ जागा जिंकल्या. शरद पवारांच्या अदृश्य हाताने देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे अल्पमतातील सरकार वाचविले. पण २२ वर्षे जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही तेवढी बदनामी २२ दिवसात सहन करावी लागली, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार पाच वर्षे टिकविण्यासाठी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना मातोश्रीवर पाठवून उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी साकडे घातले. उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस याना पाठिंबा दिला. ५ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी विरोधीपक्षनेते असलेले एकनाथ संभाजी शिंदे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामुळे सायंकाळी मंत्री झाले. २०१९ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर देवेंद्रांचे सरकार टिकले. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह मुंबईत आले आणि सॉफिटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समवेत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दरवाजाबाहेर बसले होते. ते चर्चेत सहभागी झाले नव्हते. सॉफिटेल, मातोश्री वरील चर्चेअंती वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेल मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची जाहिरात केली. लोकसभा निवडणूक पार पडली. विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढल्यानंतर पन्नास पन्नास टक्के सत्तेच्या जबाबदारी देण्या घेण्याचा करार भारतीय जनता पक्षाने मानला नाही. अखेर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी बनविली. ही महाविकास आघाडी होऊ शकते असे सर्वात आधी भाकित करणारे आज एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते बनलेत. दरम्यान २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सक्काळीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा शपथविधी उरकून घेतला. परंतु ८० तासातच अजितदादांनी घूमजाव केले. सर्वात कमी ८० तासांच्या मुख्यमंत्री पदाचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नांवे नोंदला गेला. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. याच काळात कोरोनाची खतरनाक महामारी फैलावली. स्वतः उद्धव ठाकरे गंभीर आजारातून बाहेर पडले. या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एक नव्हे दोन नव्हे तर चार चार वेळा राष्ट्रीय पातळीवर वाखाणणी होत होती. अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांनी माझे, शिवसेनेचे जे काही असेल ते एकनाथ शिंदे आपणांस सांगतील, असे सांगितले होते. त्याचा पुरेपूर फायदा एकनाथ शिंदे यांनी उचलला. अडीच वर्षे सत्ता उपभोगूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी अजित पवार हे निधी उपलब्ध करून देत नाहीत, अशा तक्रारींचा लकडा लावला. जून २०२२ मध्ये शिवसेना फोडून बाहेर पडले. सुरत, गुवाहाटी, गोवा करीत अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवीत भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनविले. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी उपमुख्यमंत्री पद आले. त्यांना सरकार बाहेर राहून सरकारवर नियंत्रण ठेवायचे होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांचा मनसुबा उधळवून लावला. ज्या अजित पवार यांनी शिवसेनेतून बंडखोरी करणारे कधीही निवडून येत नाहीत, असे राणा भीमदेवी थाटात विधानसभा सभागृहात सांगितले आणि ज्या एकनाथ शिंदे यांच्या साथीदारांनी अजित पवार यांच्या बद्दल तक्रारी केल्या होत्या त्याच अजितदादांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या पक्षातून बंड करीत फडणवीस शिंदे सरकार मध्ये जाऊन बसले. १३ मे २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचे उद्घाटन केले आणि २० मे २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना विचारले की, एकनाथ, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का ? तेंव्हा ते एकदम आश्चर्यचकित होत नाही नाही असे म्हणू लागले. उद्धव ठाकरेंनी माझ्यावर, माझ्या मुलावर उपकार केले आहेत, मी त्या उपकारांची परतफेड करु शकत नाही, असे ठासून सांगितले. पण त्यांचे तर ठरलेलेच होते. त्याबरहुकूम पुढच्या चाली खेळल्या गेल्या. ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री पदावरुन उपमुख्यमंत्री पदावर यावे लागले आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये नाखुशीनेच जावे लागले. पुन्हा अजित पवार यांच्या कडून तुटपुंज्या निधी वर बोळवण होऊ लागली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नांवाने शिव्याशाप देण्याची अहमहमिका लागली. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना माफ केले नसते, त्यांनी कधी कॉंग्रेस बरोबर जाण्याचे धाडस केले नसते, अशा वल्गना केल्या आहेत. इतकेच नव्हे तर धर्मवीर २ च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली, असे भासविण्याचा, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटना काढली, एकनाथ, तू काय करणार आहेस ? असे आनंद दिघे यांनी सांगतांनाच एका खांद्यावर हिंदुत्व आणि एका खांद्यावर शिवसेना घेऊन तू वाटचाल कर, असा जणू आदेशच दिघेसाहेबांनी आपल्या पट्टशिष्य म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना दिला असल्याचा देखावा धर्मवीर २ मध्ये उभा केला आहे. प्रत्यक्षात आनंद दिघे काय होते ? त्यांचे तत्त्व काय होते ? बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची वाटचाल कशी झाली ? २००२ साली नरेंद्र मोदी यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणी यांच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या करवी होणारी कारवाई रोखायला लावून नरेंद्र मोदी यांना वाचविले. ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार पाठिंबा देत गगनभरारी घेण्यासाठी सहकार्य केले. दिल्लीत भाजप शिवसेना आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजप असे बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगितले होते. या उपकाराची कोणत्या पद्धतीने परतफेड होत आहे, हे देशवासिय जाणून आहेत. आज वाजपेयी अडवाणी यांचा भाजप राहिलेला नाही. या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आणि धडा शिकविण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ज्यांनी कधी मातोश्रीचा उंबरठा पाहिला नाही, ज्यांनी कधी आनंद दिघे यांना पाहिले नाही, ते आता त्यांची मोठमोठाली छायाचित्रे लावून प्रचार प्रसार करण्याच्या गोष्टी करीत आहेत. वारंवार शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे यांच्यावर धोका दिल्याचा आरोप करताहेत. परंतु १९६६चा व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेला, भारावलेला हिंदू, मराठी माणूस कडवा शिवसैनिक हे कधी सहन करणार नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेणारच. सध्या सत्ताधारी उपभोगताहेत आणि सर्वसामान्य मराठी, हिंदू भोग भोगतोय. हेही दिवस निघून जातील. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. तूर्तास इतकेच ! जय महाराष्ट्र !!
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)
�
�चौकट🚩 “बाजपाईजी, नरेंद्र मोदी को हाथ मत लगावो, मोदीको मत हटावो, मोदी गया तो समझो गुजरातसे बीजेपी गया!” आशा सुस्पष्ट शब्दांत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्फत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना निरोप दिला. २००२ साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचविले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे विधान आजही गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत ऐकविण्यात येते. त्याची परतफेड श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडून करताहेत काय ? असा संतप्त सवाल हिंदुस्थानातील तमाम हिंदु बांधव, मराठी माणूस आणि शिवसेनाप्रेमी जनता करीत आहे.
जेष्ठ पत्रकार,राजकीय विश्लेषक : योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१