Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकराड सभेसाठी भाजप नियोजनाला कमी पडली तरी श्री. छ. खा. उदयनराजेंसाठी गर्दी...

कराड सभेसाठी भाजप नियोजनाला कमी पडली तरी श्री. छ. खा. उदयनराजेंसाठी गर्दी होण्याची शक्यता


कराड(अजित जगताप): सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या कराड मधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलास काका उंडाळकर, शामराव अष्टेकर तसेच स्थानिक पातळीवर ज्यांच्या नाव घ्यावे असे कराडचे नगराध्यक्ष म्हणून प्रदीर्घकाळ पदावर विराजमान झालेले ॲड. पी. डी. पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. याच कराडमध्ये देशाचे पंतप्रधान व भाजप नेते नरेंद्र मोदी यांची सैदापूर येथील विद्यानगर मध्ये सोमवारी पावणेतीन वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी भाजप पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे नियोजन पूर्णपणे फसले असले तरी महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रेमापोटी मतदार निश्चितच गर्दी करतील. असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे
श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये चैतन्य पसरले. सर्व संपर्क दौरा ते जाहीर सभा, बैठका, मिळावे याचे नियोजन करण्यामध्ये महायुतीतील काही घटक पक्ष यशस्वी झाले आहेत पण भाजप अति उत्साही पदाधिकारी व कार्यकर्ते कमी पडले. थोडक्यात सांगायचं म्हणजे युद्धामध्ये जे हाती शस्त्र आहे. त्या शस्त्रानुसार रणभूमी वरती कर्तव्य बजवावे लागते. पण भाजपमधील काही अति उत्साही नेते व कार्यकर्ते हे बैठक, मेळाव्याला दिसतात. पण, प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात प्रचारात ओघाने दिसतात .
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सातारा येथील बुथ प्रमुखांच्या बैठकीत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक पाहता प्रत्येक मतदारांची भेट घेऊन त्यांना पक्षाची भूमिका सांगणे अपेक्षित आहे. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला दहा कुटुंबीयांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता या सर्व घडामोडीचा निकाल म्हणजे सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी कराड नगरीत पावणे चार वाजता होणाऱ्या सभेला लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा आवर्जून उल्लेख करतील . आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचाही उल्लेख ते नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गुन्ह्याबाबत ओझरते का होईना पण उल्लेख करतील का? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
महायुतीचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील संपर्क दौरा, सभा, मेळावे याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना याचबरोबर सामाजिक संघटना यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. महायुती हा शब्द जरी मतदारसंघांमध्ये उच्चारला जात असल्या तरी भाजपच्या वतीने आपल्याच पोळीवर जास्त तूप घेण्याचा प्रकार काही अति उत्साही मंडळींमुळे झाला आहे हे पण उघड झाले. याबाबत राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष, शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या शिलेदारांनी ही नाराजी दूर केलेली आहे. कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये झोकून देऊन काम करण्यास व त्यांचा सन्मान राखण्यास कुठेही कमतरता केलेली नाही. त्यामुळे श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांचा विजय दृष्टिक्षेपात आलेले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मताधिक्य किती वाढणार? याची आता महायुती कार्यकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे. सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे या सभेसाठी अत्यंत चांगली सुविधा निर्माण केलेली आहे. आणि याचे सर्व श्रेय डॉ. अतुल भोसले ,विक्रम पावसकर सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवक जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, महिला संघटिका सुरभी भोसले व एकनाथ बागडी तसेच सहप्रभारी सुराणा आणि महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार महेश शिंदे आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निश्चितच द्यावे लागेल. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने सुरक्षेच्या दृष्टीने एक चांगले दमदार पाऊल टाकलेले आहे. एकूणच कराड नगरी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जोरदार तयारी झाली आहे .आता निवडणूक प्रचाराची घटिका जवळ आल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेपूर्वी कराड नगरी ही भाजपमय झाल्याचे आतापासूनच दिसून येत आहे. जिल्हा पातळीवरील व सातारा शहर परिसरातील भाजपकडून नियोजनामध्ये टोलवा टोलवी झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी महायुतीच्या उमेदवारांबाबत नसून ज्यांच्याकडे भाजपने जबाबदारी दिली आहे. त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्क्रियपणा म्हणा यातून दिसून आलेला आहे. तो मतदान दिवसापर्यंत कमी करण्यात निश्चितच यश मिळेल. अशी आशा श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची धुरा वाहणारे सर्वच कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments