
मुंबई, दि. २ ऑगस्ट : मुंबई पोलीसांचा राजा – वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पाद्यपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या शिबिरात रक्तदान, आरोग्य जनजागृती आणि सेवा कार्याला विशेष महत्त्व देण्यात आले.
महाआरोग्य शिबिराअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात अवघ्या तीन तासांत तब्बल १७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदात्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, हा उपक्रम समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
या उपक्रमासाठी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय, जोगेश्वरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पाडली.
यशस्वी आयोजनासाठी मुंबई पोलीसांचा राजा – वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, मुंबई पोलीस दल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व सहकारी, ट्रॉमा केअर रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी, स्वयंसेवक तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तवीरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.




