मुंबई : माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने शहरातील दृश्यमान स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांवर (GVP) सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निगराणी ठेवली जाणार असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सर्व वॉर्ड कार्यालयांना बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे, नाले आणि जलस्रोत परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. कचरा साचणाऱ्या ‘हॉटस्पॉट्स’चे डिजिटल मॅपिंग करून त्यांचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी जनजागृती, सेवा सुधारणा, सीसीटीव्ही निगराणी आणि दंडात्मक कारवाईचा अवलंब केला जाणार आहे.
याशिवाय शाळा, रुग्णालये, रेल्वे व मेट्रो स्थानके तसेच बाजारपेठांजवळील पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून नागरिकांसाठी चालण्यायोग्य पदपथ उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई तसेच ‘मार्ग’ अॅपवर प्राप्त खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दृश्यमान स्वच्छता ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई घडविण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.




