मेढा( अजित जगताप) : सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीत रान उठवले जात आहे. संचालक मंडळाच्या निवडीने विकासाला चालना मिळणार नसून एकमेकांचे हवे दावे वाढणार आहे. या गोष्टी गांभीर्याने लक्षात आणून देण्यासाठी जावळीतील जेन झी तरुणाई पुढाकार घेत आहेत. ही सुखद बाब ठरली आहे. जावळी तालुक्यात १५३ गावे वाड्या वस्ती आहेत.ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे, माजी आमदार भिकू दाजी भिलारे, जी.जी. कदम, डी.बी. कदम, लालसिंगराव शिंदे व साहेबराव पवार आणि सदाशिव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्यात राजकीय कारकीर्द बहरली होती. आज यापैकी काहींचे वारसदार जरी राजकीय पटलावर असले तरी त्यांना दुय्यम स्थान आहे. हे घडत असलेल्या गंभीर घटनेमुळे दिसून येत आहे. त्या मानाने वैचारिक भूमिका मांडण्यामध्ये त्या जुन्या नेत्यांचे लाभलेले नेतृत्व पहिल्या स्थानावर होते. आजही त्यांच्याबद्दल आदर आहे. या परिस्थितीमध्ये सध्या खूपच बदल जाणवत आहे.
जावळी मधील गावागावांमध्ये वाढती बेरोजगारी, राजकीय वर्चस्व आणि साईड पट्टी, डांबरीकरण ,खडीकरण, प्राथमिक शाळेच्या खोल्या, संरक्षक भिंत, समाज मंदिर, गावातील अंतर्गत रस्ते, गटार ,अंगणवाडी अशी तुकड्या तुकड्याने काम घेणाऱ्या विना अनुभवी ठेकेदारांची फौज उभी राहिली आहे. काहीजण बेकायदेशीर दारू, मटका, जुगार, चक्री मध्ये अडकून पडले आहेत. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पण, अनधिकृत धंद्यासाठी ज्या गावात जागा दिली जात आहे .त्या गावात मात्र त्याचे मूक समर्थन होत आहे. याचाही विचार होत आहे.
आनेवाडी, आलेवाडी, आखाडे, आर्डे राजकीय गटबाजीमुळे नेत्यांना खुश करण्यासाठी काही कार्यकर्ते आ वासून गोंधळात गोंधळ घालून भर घालत आहे. त्यामुळे जावळी तालुक्याची कधीही न भरून येणारी बदनामी झाली आहे. अशी खंत जुन्या माणसांनी व्यक्त केली आहे. याबाबत आता मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून जेन झी तरुणाई आता आत्मचिंतन करत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी खेड्यापाड्यातून आता आवाज उठवत आहे. याला चांगल्या विचाराच्या लोकांनी प्रतिसाद द्यावा. अशी आर्त हाक ऐकू येऊ लागलेली आहे.
जावळी तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये सध्या १४ ते २९ वयोगटातील किमान चाळीस टक्के लोकसंख्या आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जावळीत उद्योग व्यवसाय नाही. याची खंत असणाऱ्या या वयोगटातील युवक व तरुणांनी आता संघर्षाचे राजकारण नको रे बाबा… विकासात्मक धोरण पालकांच्या सुविचाराने राबवू आबा… असा नारा देण्यास सुरुवात केलेली आहे.
समाज माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने संधी मिळत असल्याने जावळीतील होतकरू व हुशार युवक व्यक्त होत आहेत. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा आशेचा किरण ठरलेला आहे. जावळी तालुक्यातील खेड्यापाड्यातून आध्यात्मिक विचारासोबतच उद्योग व्यवसायामध्ये गरुड झेप मारणारे असंख्य जावळीकर आहेत. त्यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी आता वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत. निसर्गरम्य जावळीमध्ये पर्यटन वाढीसोबतच कृषी प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म व लघुउद्योग आणि मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती होऊ शकते. यासाठी लक्ष केंद्रित झाले आहे. घडलेल्या राजकीय घटनेबाबत सातत्याने नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जावळीभक्तीचा उगम व्हावा. अशी युवकांची अपेक्षा आहे. यासाठी जावळी तालुक्यातील महत्त्वाचे करहर, कुडाळ, सायगाव, केळघर, मेढा भागातील युवक व तरुण संदीप माने, अथर्व निकम, वंदना कांबळे, सोहेल शेख, विक्रम चव्हाण, संदीप गायकवाड, प्रकाश वारागडे, उमेश जगताप, सुजित शिंदे,शिवाजी जाधव, सुरेश भोसले, सिद्धी माने, विजय पवार, बाळू फरांदे,विकास शिंदे ,सुनील शिंदे, सुमित मोरे, विकी भिलारे,महेश ससाणे, विक्रांत भोसले व इतर युवक सक्रिय झाले आहेत. उद्योग व्यवसायासाठी धडपडणारे व यशस्वी होणारी मोठी फौज जावळी तालुक्यात आहे. त्यांनी आता आपणच आपल्या यश गाठणाऱ्या जीवनाचे शिल्पकार होऊ. अशा पद्धतीने एकमेकांशी समाज माध्यमातून संवाद साधून अध्यात्मिक व व्यावसायिक व प्रगतिशील जावळीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे . यासाठी जावळीचे भूमिपुत्र असलेले वरिष्ठ अधिकारी व व्यावसायिक आणि उद्योजक यांचा पाठिंबा नक्कीच मिळेल. अशी आशा वाटत आहे.
——————————————-
फोटो-सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्या बाबत प्रतिकात्मक फोटो..




