ताज्या बातम्या

अण्णाभाऊ डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे पाईक – डॉ. शरद गायकवाड

सातारा – साहित्यरत्न, लोकशाहीर, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असून त्यांनी जग बदलण्याचे मानव मुक्तीचे, समतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून समाजा-समाजामध्ये नाहक रणकंदन माजवून मनभेदाचे राजकारण थांबवावे. माणसे जोडण्याचे काम करावे,असे आवाहन, प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे, विश्वस्त डॉ. जयपाल सावंत, केशवराव कदम उपस्थित होते.
डॉ. गायकवाड यांनी अण्णाभाऊंचा बाबासाहेबांच्या प्रति आदर व्यक्त करणारा ‘ जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव! एकजुटीच्या रथावर आरुढ होऊनी’ हा प्रसिद्ध पोवाडा उदृत केला व अण्णाभाऊंचा मानव मुक्तीचा दृष्टिकोन प्रतीत करणाऱ्या निवडक साहित्य कृती कथन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
डॉ. गायकवाड म्हणाले, अण्णा भाऊंचे नाव तुकाराम. या आधुनिक तुकारामाने आपल्या साहित्याद्वारे श्रमिक,वंचित बहुजनांची गाथा लिहून संत तुकाराम यांचा कित्ता गिरवला आहे. त्यांनी फुले,आंबेडकर, मार्क्स यांच्या सत्यशोधकी पुरोगामी विचारांची कास धरली. आपली प्रतिभा साम्यवादाच्या प्रचार प्रसारासाठी राबविली.त्याचा विसर पडता उपयोगी नाही.
दिनकर झिंब्रे म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे बाबुराव बागुल शंकराव खरात यांच्या पिढीचे पहिले बंडखोर विद्रोही लेखक आहेत. त्यांनी मानवी प्रतिष्ठा व स्वाभिमान जोपासणारे अव्वल दर्जाचे साहित्य निर्माण केले आहे. साम्यवादी विचारावर त्यांची अढळ निष्ठा होती. ते कॉम्रेड होते. कॉम्रेड होणे, कम्युनिस्ट पार्टीचे कार्ड होल्डर होणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांची ही खरी मूळ ओळख आणि विचार पुसण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहेत. म. फुले डॉ.आंबेडकर यांच्याप्रमाणे एका जातीचे प्रतीक बनवून
त्यांचेही अपहरण करण्याचा
धोका वाढला आहे.
अण्णाभाऊ व्यापक पुरोगामी चळवळीचे आयकॉन आहेत. त्यांच्या रक्तात क्रांती होती.त्यांनी पहिला पोवाडा मच्छर वर लिहिलेला आहे. आज ते हयात असते तर अभिजीत दिपके यांच्या केंद्र सरकारला हादरा देणाऱ्या जेन झी च्या सिव्हील सोसायटीच्या आंदोलनात त्यांची शाहिरी कडाडली असती. त्यांनी जाती जाती फूट पाडणाऱ्या कारस्थानांना ठाम विरोध केला असता.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयपाल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी
प्रतिष्ठानचे तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते, सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————

Scroll to Top