ताज्या बातम्या

चर्मकार समाजासाठी रार्टी स्थापन करावी क्राफची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : चर्मकार व तत्सम अनुसूचित जातींच्या सर्वांगीण शैक्षणिक, प्रशासकीय, आर्थिक आणि कौशल्य विकासासाठी संत रोहिदास अँडव्हान्स्ड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (रार्टी) ही राज्यस्तरीय स्वतंत्र व स्वायत्त संस्था तातडीने स्थापन करण्यात यावी, अशी मागणी नुकतीच चर्मकार रिसर्च अँड ॲनालिसिस फाउंडेशन (क्राफ) च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने विविध वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या असून, त्याच धर्तीवर चर्मकार व तत्सम अनुसूचित जातींसाठी ही स्वतंत्र संस्था स्थापन होणे ही काळाची गरज आहे. या समाजामध्ये बौद्धिक क्षमता, नेतृत्वगुण आणि पारंपरिक कौशल्यांची मोठी क्षमता असूनही स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा, संरक्षण सेवा, कौशल्य विकास, संशोधन आणि उद्योजकता विकासासाठी स्वतंत्र संस्थात्मक व्यवस्था उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावित रार्टी संस्थेमार्फत युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, सीएपीएफ, एनडीए, सीडीएस, अग्निवीर तसेच इतर संरक्षण सेवांसाठी दर्जेदार प्रशिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता विकास, संशोधन, डिजिटल शिक्षण, निवासी प्रशिक्षण केंद्रे, करिअर मार्गदर्शन, महिला व युवक सक्षमीकरण, शिष्यवृत्ती, संशोधन फेलोशिप आणि समाजाच्या इतिहास व सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण यांसारखे उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या संस्थेच्या स्थापनेमुळे चर्मकार व तत्सम अनुसूचित जातींमधून अधिकाधिक आयएएस, आयपीएस व इतर अधिकारी घडतील, युवकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व समान संधी उपलब्ध होतील, रोजगार व उद्योजकतेला चालना मिळेल तसेच सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासाच्या राज्याच्या धोरणाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

हे निवेदन चर्मकार रिसर्च अँड ॲनालिसिस फाउंडेशन (क्राफ) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामकिसन ठोंबरे आणि सचिव देवराम कचरु केदार यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, राज्य शासनाने ही मागणी सकारात्मकरीत्या विचारात घेऊन संत रोहिदास अँडव्हान्स्ड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (रार्टी) तातडीने स्थापन करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Scroll to Top